केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची वेंगुर्ला न.प.ला भेट

  देशात सर्वप्रथम वेंगुर्ला नगरपरिषदेने शुन्य कचरा संकल्पना यशस्वीपणे राबवित  नागरिकांच्या मागणीप्रमाणे विकासकामे केली. ब्रिटीश-डचकालीन नारायण तलावाचे पुनरुज्जीवन व डच वखार पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या लागणाऱ्या परवानग्या मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करीन असे आश्‍वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या भेटीप्रसंगी व्यक्त केले.

      मिश्रा यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथे भेट देऊन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विकसित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. दैनंदिन संकलित कचऱ्याचे विविध प्रकारात करण्यात येणारे वर्गीकरण, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती, सुक्या कचऱ्यापासून तयार होणारा कांडी कोळसा, कचऱ्यावर विविध प्रकारच्या प्रक्रिया करणाऱ्या यंत्रांची माहिती घेतली. तसेच वेस्ट टु बेस्ट संकल्पनेनुसार विकसित करण्यात आलेले मिरॅकल पार्क, यमादोरी गार्डन येथे भेट दिली.

      एक स्वयंपूर्ण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासोबतच पर्यावरणपूरक असे मिरॅकल पार्क, यमादोरी गार्डन यांचा समावेश असलेले हे ठिकाण नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे प्रकल्प संपूर्ण देशामध्ये राबविल्यास स्वच्छ व सुंदर भारत घडविता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

      नगरपरिषदेतील स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालनास दिली. यावेळी कोकणी संस्कृती, विविध सण व उत्सव, वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक व पर्यटन स्थळे यांच्या हुबेहुब प्रतिकृतींसह माहिती दर्शवणारे वैशिष्ट्यपूर्ण कलादालन पाहून ते भारावून गेले.

      न.प.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री मिश्रा यांचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी शाल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. मुख्याधिकारी यांनी नारायण तलावाचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण करणे तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या डच वखार इमारतीचा विकास करुन त्याठिकाणी लेजर लाईट शो, ऐतिहासिक माहिती देणारे संग्रहालय विकसित करणाऱ्या प्रकल्पाची माहिती देऊन याकामी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ए.एस.आय.) यांच्याकडून आवश्‍यक ती परवानगी मिळण्याबाबत व या प्रकल्पासाठी आवश्‍यक निधी नगरपरिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली.

      मिश्रा यांनी घोडेबाव उद्यान, त्रिवेणी उद्यान, मानसीश्‍वर उद्यान, कवीवर्य मंगेश पाडगावकर बालोद्यान, नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह या ठिकाणी भेटी देऊन नगरपरिषदेमार्फत केलेल्या कामांचे कौतुक केले. नगरपरिषदला शक्य तेवढी मदत व आवश्‍यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. भविष्यात केंद्र स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

      यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, संदीप लेले, अतुल काळसेकर ,प्रभाकर सावंत, शरद चव्हाण, भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक-नगरसेविका व शहरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu