सोशल मीडिया आणि मुलांचे आरोग्य

काही दिवसांपूर्वी ट्रेनने रात्रीचा प्रवास करताना कंपार्टमेंटमध्ये माझ्यासमोरच एक जोडपे आणि त्यांची साधारण आठ-नऊ महिन्याची मुलगी बसली होती. ट्रेन सुरू होईपर्यंत ती छोटी पोहोचवायला आलेल्या नातेवाईकांशी खेळत होती. मात्र ट्रेन सुरू झाली आणि तिने रडायला सुरुवात केली. त्याबरोबर तिच्या आईने मोबाईल बाहेर काढला आणि तिला कार्टून किंवा तत्सम काहीतरी गोष्टींचे चॅनेल लावून दिले. त्याबरोबर तो मोबाईल हातात घेऊन ती मुलगी अखंड त्या मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे लावून बसली आणि आई-बाबा गप्पा मारायला मोकळे झाले. थोड्या वेळाने तिला भुकेची जाणीव झाली आणि आईच्या ते लक्षात आल्यावर तिच्यासाठी आणलेला भाताचा डबा काढून आईने तिला भरवायला घेतले. त्याबरोबर मोबाईल हातात घेऊन तिला दिसेल असा धरायची जबाबदारी वडिलांनी घेतली आणि त्यावरची नजर न हलवता ती छोटी आईने भरवलेला एक एक घास खाऊ लागली.

      मी त्या कुटुंबावरून जरा नजर हटवून आजूबाजूला बघू लागले. तर वरच्या दोन-तीन बर्थवर एका शाळेतील साधारण तेरा-चौदा वयोगटातील मुलांचा गट फुटबॉलच्या स्पर्धा खेळून पुन्हा घरी परत जात होता. प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता आणि आपापल्या अगदी जवळच्या मित्रांचा ग्रुप करून ते त्यात डोके खुपसून बसले होते. शिक्षक मात्र परत-परत येऊन मुलांची संख्या-सीट याचा मेळ घालण्यात गुंतले होते. त्यांना मदत करायचे सोडून मुलांच्या मोबाईलमधून सतत नोटिफिकेशनचा आवाज येत होता. काहीजण सेल्फी काढण्यात दंग होते तर काही मुले कोंडाळे करून बसून एकाच मोबाईलवर कोणतातरी सिनेमा बघण्यात गर्क होती.

      हे सर्व माझे निरीक्षण चालू असतानाच माझ्या समोरच्या बाकावरून पुन्हा त्या छोटीचा जोरात किंचाळून रडण्याचा आवाज आला. म्हणून वळून पाहिले तर छोटी आईच्या मांडीवर झोपली होती. ती झोपली म्हणून वडिलांनी तिचे कार्टून बंद करून ठेवले. तो आवाज बंद झाला म्हणून ती किंचाळून रडत उठली होती. त्यामुळे पुन्हा ते कार्टून सुरू करण्यात आले. म्हणजे आता रात्रभर या कार्टूनच्या आवाजाचे अंगाईगीत ऐकत आपल्याला झोपावे लागणार हे माझ्या लक्षात आले.

      आपल्या आजूबाजूला हे असेच प्रसंग थोड्याफार फरकाने सातत्याने घडताना आपण बघत असतो. आणि मग मनात विचार येतो की खरोखरच सोशल मीडिया हा शाप आहे की वरदान? वास्तविक कोणतेही तंत्रज्ञान जसे उपयुक्त असते तसे ते काही अंशी घातकही ठरू शकते. त्यासाठी वेगवेगळ्या आयामांचा विचार करण्याची गरज आहे. परंतु आपला आजचा विषय हा केवळ आरोग्याशी संबंधित असल्याने त्यावर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांची चर्चा आपण करणार आहोत.

      आयुर्वेदात निरोगी किंवा स्वस्थ माणसांची व्याख्या करताना म्हटले आहे- “प्रसन्नात्मेंद्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते।“ म्हणजेच आपले शरीर, मन व आत्मा प्रसन्न असणे म्हणजे निरोगी आयुष्य होय. म्हणूनच आरोग्याचा विचार करताना केवळ बाह्य शरीरच नाही तर मनावर किंवा बुद्धीवर होणाऱ्या परिणामांचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे.

      हा विचार करताना एक लक्षात येते की मोबाईल आणि इंटरनेट वापरण्याची गरज आणि त्याचे व्यसन या दोन गोष्टींमधील सीमारेषा पुसट होत चालली आहे.  बऱ्याच प्रमाणात ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे अगदी सहा-सात वर्षाच्या मुलाला सुद्धा मोबाईल किंवा लॅपटॉप हातात द्यावा लागत आहे. अभ्यासासाठी वापर करता करता ही मुले त्यातील गेम, सोशल मीडिया याच्या प्रेमात पडून कधी त्याच्या आहारी जातात ते त्यांना स्वतःला आणि आई-वडिलांच्या सुद्धा लक्षात येत नाही. तर काही वेळा आई-वडीलही अगदी लहान वयात गम्मत म्हणून किंवा त्यांना स्वतःला वेळ नसल्याने मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी मोबाईल हातात देतात. जसे सुरुवातीला सांगितलेल्या प्रसंगात त्या छोट्या मुलीच्या बाबतीत घडताना दिसते तसे.

      भविष्यात ऑनलाईन शिक्षण, होम स्कूलिंग या पर्यायाचा अधिक प्रमाणात वापर सुरू होईल. काही वर्षांनी ती काळाची गरजही बनेल. आणि त्यामुळेच कदाचित ही समस्या अधिक गंभीर स्वरूप घेऊ शकते. व्यसन आणि गरज याचा योग्य मेळ घालता न आल्यामुळे अतिरिक्त स्क्रीन टाईम ही मोठी समस्या आहे. डॉ. राजेंद्र बर्वे हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मतानुसार ही समस्या गंभीर रूप धारण करत आहे. त्यांच्याकडे या समस्येसाठी समुपदेशन करून घेण्यासाठी येणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण जवळजवळ 70% आहे. तर काय आहेत या समस्या?

* सोशल मीडिया एंझायटी- मेसेज, नोटिफिकेशन बघायला न मिळाल्याने येणारी अस्वस्थता.

* फोमो (fear of missing out)- आपल्याकडून काही गोष्टी बघणे राहून जाऊ नये ही सततची भीती.

* अफेक्शन (affection)- सध्या आई-वडील सतत आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे मुलांना पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रेमासाठी आसुसलेली ही मुले लाईक्स-कमेंट्सच्या माध्यमातून प्रेम शोधत राहतात. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे आभासी जगात सातत्याने त्यांचा वावर सुरू असतो. काही दिवसांनी हेच जग त्यांना खरे वाटू लागते.

* नैराश्‍य- आभासी जगात दाखवल्या गेलेल्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवायला न मिळाल्याने येणारे नैराश्‍य.

* मुलांचा हिंसक/आक्रमक स्वभाव – वाढलेल्या स्क्रीन टाईमचाच पुढचा भाग म्हणजे मुलांचा होत चाललेला आक्रमक स्वभाव आहे. त्यांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंधने आणली तर ती आक्रमक बनतात. काही चित्रपट, मारामारी-युद्ध असणारे खेळ, वेब सिरीजमध्ये दाखवले जात असणारे हिंसाचार, अश्‍लील भाषा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनत चालला आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या स्वभावात उतरू लागले आहे. कारण तेच खरे आयुष्य आहे असा त्यांचा समज होऊ लागला आहे. भविष्यात हेच चालू राहिले तर ही मुले अधिक आक्रस्ताळेपणा करण्याची शक्यता आहे.

* एकाकीपणा- जास्तीत जास्त वेळ मोबाईल गेम, वेब सिरीज यात घालवत असल्यामुळे मुलांचे सार्वजनिक जीवन (सोशल लाईफ) कमी होत चालले आहे. परिणामी मुले अधिकाधिक एकलकोंडी बनत आहेत. त्यांना स्वतःच्या आयुष्यात कोणाची ढवळाढवळ नको आहे. हिंसक-अश्‍लील चित्रपट-वेबसिरिज बघण्याची चटक, सांघिक खेळाचा अभाव किंबहुना शारीरिक हालचाली होतील अशाही खेळांचा अभाव, आई-वडिलांना मुलांसाठी वेळ नसणे अशा अनेक कारणांमुळे ती एकाकी पडत आहेत.

* शारीरिक अनारोग्य- मोबाईल-इंटरनेटचा अतिप्रमाणात वापर, खाण्यापिणाच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे मुलांमध्ये आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. सतत एकाच जागी बसणे आणि त्याच्याबरोबरच जंक फूड, शीतपेय, रेडी टू इट यासारख्या पदार्थांचे सातत्याने सेवन करणे, अवेळी आहारसेवन करणे यामुळे मुलांचे शारीरिक आरोग्य बिघडत आहे. त्यांच्यातील स्थूलपणा वाढत आहे. अपचन, भूक न लागणे यासारख्या तक्रारी वाढत आहेत.

      खरं तर अगदी बाल्यावस्थेत असताना मुलांना त्यांच्या आजूबाजूला दिसणारे दृश्‍य, रंग, ध्वनी, वास, स्पर्श याच्या अनुभवातून नवनवीन गोष्टींचा परिचय होत असतो. पण सध्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेली ही मुले हे अनुभव घेऊच शकत नाहीत. काही ठराविकच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांचा अतिरिक्त प्रमाणात वापर होत आहे. माती-पाण्यात खेळली तरच मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते हे सत्य आहे. त्यांना जास्तीतजास्त निसर्गाच्या सहवासात नेणे, झाडे-पाने-फुले याना स्पर्श करणे, त्यांचे अनेक प्रकारचे रंग दाखवणे, फुलपाखरे, पक्षी, प्राणी यांची ओळख करून देणे, गवतावर चालायला लावणे अशा विविध माध्यमातून त्यांच्या कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये यांच्या विकासाला मदत होत असते. जी त्यांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राखणारी साधने आहेत असे म्हटले जाते. सहा महिने ते तीन वर्षांच्या मुलांमध्ये तर  कुतूहल, एखादी गोष्ट वारंवार करून बघणे, सक्रियता स्वाभाविक असते. परंतु आपणच लावत असलेल्या अयोग्य सवयीमुळे त्यांच्या नैसर्गिक प्रेरणा दडपून जात आहेत. हेही एक प्रकारचे अनारोग्यच आहे.

      बदललेली सामाजिक परिस्थिती, चुकीची जीवनशैली, सोशल मीडियामधून मिळालेले अवेळी आणि अयोग्य ज्ञान याचा परिणाम म्हणून मुले अकाली वयात येऊ लागली आहेत. शारीरिक दृष्टीने ती वयात आली तरी मानसिकदृष्ट्या ती अपरिपक्वच असतात. अशा वेळी चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने बलात्कार, अकाली गर्भधारणा अशा समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

      या सर्व गोष्टी पाहिल्यावर, वाचल्यावर साहजिकच आपल्या मनात प्रश्‍न उद्भवतो की मग सोशल मीडियाचा वापरच करायचा नाही का? तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट मूलतः कधीच वाईट नसते तर “योजक: तत्र दुर्लभ:“ या न्यायाने त्याचा योग्य पद्धतीने वापर करणारेच दुर्लभ आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर पारा, गंधक, कुचल्याचे बी, खाजकुयली ही वनस्पती हे शरीरासाठी घातक आहे असे समजले जाते. पण आयुर्वेदात हेच घटक योग्य पद्धतीने शुद्ध करून आणि योग्य प्रमाणात वापरल्यावर रोगावरील इलाजासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.

      खरं तर गेल्या दोन वर्षात कोरोनाने जेव्हा माणसाच्या शरीरावरच नव्हे तर मनावरही आघात केले होते, तेव्हा केवळ या सोशल मीडियानेच माणसांना माणसांशी जोडून ठेवले होते. सामाजिक आरोग्य आणि वैयक्तीक आरोग्य यामध्ये सतर्कता वाढण्यासाठी या माध्यमाचा निश्‍चितच उपयोग होतो. सातत्याने सोशल मीडियावर आहार-विहार यावर विचारमंथन केले गेल्यामुळे गेल्या काही दिवसात बऱ्याच घरातील मुलांना सकस अन्न खाण्याची सवय लागत आहे. फास्ट फूड, रेडीमेड फूड पॅकेट यांना आळा बसल्यामुळे बरेचसे व्याधी कमी व्हायला मदत होत आहे. व्यायामाचे महत्त्व सर्वानाच पटल्यामुळे मुलांनाही पालकांकडून तशा सवयी लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्याचे फायदेही जाणवत आहेत. अतिदुर्गम भागातही आरोग्यसुविधा सक्षमपणे पोहोचवण्यास सोशल मीडियाचा सिंहाचा वाटा आहे. बरेचसे पालक घरूनच काम करू लागल्यामुळे मुलांना त्यांचा सहवास अधिक मिळू लागला आहे. परिणामी मुलांची एकाकीपणाची समस्या बऱ्याच अंशी कमी होत आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमांचा ताळमेळ घालून मुलांना शिक्षणात अधिकाधिक रूची निर्माण केली जात आहे. काही वेळा ज्या गोष्टी त्यांना प्रत्यक्ष दाखवणे शक्य नाहीत त्या सोशल मीडियाच्या मदतीने त्यांना सहज उपलब्ध करून देता येत आहेत. जगातील एका टोकावरची व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी एका क्षणात संपर्क साधू शकते. त्यामुळे काही व्याधींवरच्या उपचारासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला ऑनलाईन पध्दतीने घेता येऊ लागला आहे.

      बऱ्याचदा आई-वडील ऐकण्याची भूमिका न घेता केवळ बोलण्याची म्हणजेच उपदेशकाच्या भूमिकेतच असतात. त्यामुळे मुलांशी एकतर्फी संवाद (monologue) होतो, संभाषण (dialogue) होत नाही. मुलांना आपले शांतपणे ऐकून घेणारा श्रोता पण हवा असतो. अशावेळी ज्या गोष्टींचा मुलांना त्रास होतो आणि ते संकोचामुळे प्रत्यक्ष बोलू शकत नाहीत त्या गोष्टी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भावनांचा निचरा होऊन  त्यांच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होत आहे.

      म्हणूनच सोशल मीडिया हे एक प्रकारचे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर अत्यंत तारतम्याने केला गेला तर ते मुलांच्या आरोग्यासाठी निश्‍चितच उपयुक्त ठरू शकेल. अमेरिकेत तर लहान मुलांच्या स्क्रीनटाइमसंबंधी काही नियमच ठरवून दिले आहेत. 18 महिन्यापेक्षा लहान मुलांच्या हातात गॅजेट्स देऊ नका अशी सूचना आहे. शिवाय 18 ते 24 महिन्यांपर्यंत मुलांना केवळ आई-वडिलांनीच, ठराविकच वेळ आणि त्यांना उपयुक्त असणारेच कार्यक्रम दाखवावेत, 2 ते 5 वर्षापर्यंत मुलांना केवळ एक तासच गॅजेट्स हाताळायला द्यावीत, सहा वर्षे व त्यावरील मुलांना गरज असेल तर ठराविक वेळच गॅजेट्स वापरण्याची सवय लावावी अशा सूचना आहेत. संपूर्ण जगातच अशा काही नियमावली राबवण्याची गरज आहे. कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की सर्पदंशावरील उपाय म्हणून सर्पाचेच विष (anti-venum) वापरले जाते. तसाच हा सोशल मीडियाने आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीलाही दंश केला आहे. पण त्याच्यावर उतारा म्हणून भविष्यात सोशल मीडियाच उपयोगी पडणार आहे हे निश्‍चित!

– डॉ. मेधा फणसळकर 9423019961

Leave a Reply

Close Menu