मातोंडची ग्रामदेवता श्री देवी सातेरी : जत्रौत्सव विशेष

आदिशक्ती आदिमाया देवीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. अशाचप्रकारे दक्षिण कोकणातील स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावच्या श्री देवी सातेरीची ख्याती आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीचा जत्रोत्सव साजरा होतो. यावर्षी 26 नोव्हेंबर 2023 रोजी हा जत्रोत्सव थाटात संपन्न होतोय.

     वारूळ रुपात प्रकट झालेल्या या आदिशक्तीचा जत्रोत्सव म्हणजे भक्तांसाठी पर्वणीच असते. या दिवशी भाविक निर्जळी उपवास धरून मंदिराभोवती लोटांगण घालतात. म्हणून ही जत्रा ‘लोटांगणाची जत्रा‘ म्हणूनही प्रसिद्ध आहे.

     श्री देवी सातेरी हे मातोंड गावचे प्रमुख देवस्थान आई सातेरीचा मायेच्या सावलीत वाढलेल्या व श्री देव घोडेमुख, रवळनाथ यांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेला निसर्गसंपन्न मातोंड गाव. श्री देवी सातेरीचा दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून लौकिक आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक या देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.  देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. या गावात देवीची प्रकट होण्याची आख्यायिका ही प्रसिद्ध आहे. फार वर्षांपूर्वी गावच्या मध्यावर असलेल्या मंदिर परिसरात दाट राई होती. या राईत असलेल्या वरूळावर येथील एका गावकऱ्याची गाय जाऊन रोज पान्हा सोडत असे. हा प्रकार लक्षात आल्यावर येथील अन्य गावकऱ्यांच्या कानावर त्यांनी ही बाब घातली. मग त्या राईत शोध घेतला असता याठिकाणी देवीचे वास्तव्य असल्याचे लक्षात आले. याठिकाणी नियमित पूजाअर्चा सुरू झाली. काही दिवसांनी याठिकाणी छोटे मंदिर उभे राहिले. आज श्री देवी सातेरीचे भव्य देवालय थाटात उभे आहे. सातेरी पंचायतन देवस्थानात सातेरी मंदिर प्रमुख असून बारापाचाच्या राठीचे मेळेकरी, भूतनाथ व पावणाई अशी तरंगकाठी सातेरी मंदिरात असतात. देवीच्या कौलाने गावातील सर्व धार्मिक विधी व सलाबाती मार्ग पार पडतात. श्री देव घोडेमुख, रवळनाथ, रामेश्‍वर, गिरोबा, बामणादेवी, वेतोबा आदि देवस्थाने या परिवारात येतात. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीचा जत्रौत्सव साजरा होतो. या दिवशी भाविक निर्जळी उपवास धरून मंदिराभोवती लोटांगण घालतात. या दिवशी मंदीरात सकाळपासून नवस फेडणे, ओटी भरणे आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सायंकाळी गावकर मंडळी व अन्य मानकऱ्यांच्या उपस्थित तरंगकाठीसहित उत्सव मुर्त्या मंदिरात वाजत गाजत आणल्या जातात. यानंतर दीपमाळ पणत्यांची सजवली जाते. रात्री लोटांगण पाठोपाठ देवी सातेरीचा पालखी निघते. लोटांगण कार्यक्रमानंतर गावातील स्थानिक दशावतारी यांचा नाट्यप्रयोग संपन्न होतो. देवीच्या उत्सवाचे नयनरम्य क्षण डोळ्यात साठवून भाविक आपल्या घरी परततात. आई सातेरीचा आशीर्वाद गाव, सर्व ग्रामस्थ, भविकांवर सदैव राहो हीच या जत्रोत्सवादिवशी आई सातेरी चरणी प्रार्थना.

                     – प्रथमेश गुरव 9021070624

Leave a Reply

Close Menu