श्रीदेवी सातेरी जत्रौत्सव विशेष

  वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीचा पहिला जत्रौत्सव रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे.  खरेतर परब कुळाच्या मुळपुरुषाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीदेवी सातेरी अणसूर येथून येथे आली. त्या पुण्यपुरुषाची भक्ती थोर होती. म्हणूनच श्रीदेवी सातेरी ही भक्ती व श्रद्धेचे प्रतिक आहे.

      दिवाळी हा हिंदू धर्मियांचा आनंदाचा उत्सव. कोकणात खास करुन सिंधुदुर्गात दीपावली उत्सव नरकचतुर्दशी पासून सुरू होतो. त्याची सुरुवात गावागावात मंदिरात पालखी प्रदक्षिणेने होते. दिवाळीनंतर बारस म्हणजे तुलसीविवाह व त्यानंतर येणाऱ्या ग्रामदेवतांच्या जत्रांपर्यंत हा उत्सव लांबलेला असतो. भातशेतीची कापणी संपलेली असते. घरात धनधान्य आलेले असते. पाऊस ओसरुन थंडीला सुरुवात होत असते. अशा आल्हाददायक वातावरणाचा परिणाम जनमानसावर होत असतो आणि याच कारणाने देव-देवतांच्या जत्रा यांचे नियोजन केले असावे.

      वेंगुर्ल्याचा श्रीदेवी सातेरीची पहिला जत्रौत्सव त्रिपुरारी पौर्णिमेस होतो व देवस्थानच्या संबंधित 27 जत्रौत्सव झाल्यानंतर माघ पौर्णिमेस शेवटची जत्रा होते. त्यास ’बसकीची जत्रा’ असे म्हटले जाते. गेल्या 20-25 वर्षात जत्रौत्सवाची व्याप्ती बरीच वाढली. जत्रौत्सवात मंदिरात केलेली फुलांची सजावट, मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई, रात्री पालखी प्रदक्षिणेच्या वेळी केली जाणारी फटाक्यांची आतषबाजी भाविकांना आकर्षित करते.

      देवस्थानचा रितसर ट्रस्ट झाल्यानंतर देवस्थानचा एकंदर बाबतीत आमुलाग्र बदल झाला. मंदिर सुशोभिकरण, परिसर सुशोभिकरणाबरोबर मालमत्तेत झालेली वाढ उल्लेखनीय आहे. पालखी प्रदक्षिणेत चांदिच्या पालखीची प्रदक्षिणा बहुसंख्येने बघण्याचे भाग्य भाविकांना लाभत आहे. भक्तनिवासामधील वातानुकुलीत कॉन्फरन्स हॉल बांधकाम पूर्णत्वास येत आहे. यामध्ये मिटींग, छोटे समारंभ या उद्देशाने उभारलेल्या या बहुउद्देशीय सभागृह लवकरच लोकांच्या सेवेत येत आहे.

      तरी या आनंद सोहळ्यास सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे ही विनंती.

-श्री. रवी परब, 94235 13738

Leave a Reply

Close Menu