व्यवस्थेला हवा मानवी चेहरा..

         आज एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टेली मेडिसिन उपचार प्रणाली द्वारे दुर्गम भागातील रूग्णांवर उपचार कशाप्रकारे होतील याचे प्रयोग होत आहेत. आयुष्ामान भारत, महात्मा फुले योजना अशा योजनांवर उपचारांवरील खर्चाची रक्कम मर्यादा प्रति कुटुंब पाच लाख रूपयांपर्यंत करण्यात आली आहे. 108 ,102 असे क्रमांक आपल्या मोबाईल मधून डायल करताच अत्यवस्थ रूग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका त्वरित आपल्या सेवेस हजर होईल असे जाहिरातीतून सांगण्यात येते. पण आजही शिक्षण आणि जागरूकतेचा अभाव असलेल्या भटक्या विमुक्त, आदिवासी समुदायापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचताना दिसत नाही. कदाचित या माणसांचा चेहरा या योजनेमध्ये डिजिटली स्कॅनच होत नसेल.

      स्थळ – उपजिल्हा रूग्णालय, सावंतवाडी  वेळ – रात्री आठ

      जेमतेम दिड दोन वर्षाचे निरागस बाळ त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून कळवळणारी आई, श्‍वास घेण्यासाठी संघर्ष करणारा आणि धापा टाकणारा तो इवलासा जीव; त्या समोर हतबल झाल्यासारखी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा; हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्‍य काही केल्या नजरेसमोरून जाई ना.

      या अस्वस्थतेच्या भावनेला वाट मोकळी करून देण्यासाठी किमान लेखण्ाीतून व्यक्त होण्यावाचून पर्याय उरला नाही.

      काही कामानिमित्त गावी सावंतवाडीत होतो. कोणी आजारी, काही बरा, वाईट प्रसंग असेल तर रुग्णालयाची वारी ठरलेली. तशाच एका प्रसंगात शासकीय रुग्णालयात रात्री 8 वाजण्याच्या दरम्याने जाण्याची वेळ आली. ज्या तरूणाचे निधन झाले त्यांच्या नातेवाईकांना भेटावे आणि अंतिम दर्शन घ्यावे म्हणून रूग्णालय गाठले. मात्र काही कारणांनी हा उद्देश सफल झाला नाही. एका कर्मचारी बंधूकडून सरकारी उत्तर मिळाले, ‘मी आत्ताच ड्युटीला आलो, मला काही माहिती नाही‘. चौकशी केली तर बॉडी शवागरात होती. नातेवाईक घरी होते. त्यामुळे रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी निघालो. गाडी काढली गेट मधून बाहेर पडणार तोच चित्त विचलीत होणारे दृश्‍य दिसले. जेमतेम दिड दोन वर्षाच्या बालकाची आई गर्भगळीत होऊन असहाय्यपणे मुलाला खांद्यावर घेऊन ॲम्ब्युलन्ससाठी थांबली असावी. तिच्या सोबत दोन महिला, तिला धीर देत होत्या. विचारपूस केली तर बाळाला खूप बरे नाही गोवा बांबुळीला न्यायला सांगितले आहे. पण ॲम्ब्युलन्स नाही. बाळ तर अत्यवस्थ आहे, कुठे जावे, काय करावे कळेना, अशी त्या आईची अवस्था झालेली. मुल तर अक्षरशः वेदनेने विव्हळत होते. त्याचा आवाजही फुटत नव्हता, पण त्याची ती श्‍वास गुदमरल्याची स्थिती भयंकर वेदनादायी होती. ताबडतोब गाडी स्टँडला लावली. त्या महिलांना म्हटले, आत्ताच्या आता हॉस्पिटल मध्ये चला. मुलाला ताबडतोब उपचाराला घ्यायला सांगा, सोबत येतोय, तात्काळ चला. तशी धावतपळत भरल्या डोळ्यांनी ती आई पुन्हा शासकीय रूग्णालयाच्या काऊंटरवर गेली. पाठोपाठ पोहोचतो, तोच नर्सचा आवाज कानात पडला. बाई रडून काही होणार नाही; तसा पुढे गेलो. बाळाला ताबडतोब बघा म्हटले. माझी एन्ट्री त्यांना अनपेक्षित असावी, बहुदा; कारण ती मंडळी अत्यंत गरीब आणि भटक्या समुदायातील होती. त्यातल्यात मी जरा बऱ्या कपड्यात दिसलो असेन म्हणून प्रश्‍न आला तुम्ही कोण? मी सांगितले मी यांच्या सोबत आहे. ताबडतोब पहा. वास्तविक मी त्यांना अजिबात ओळखत नव्हतो, तरीही हेच माझे सगळे सोयरे आहेत, असा आव आणत पुढे सरसावलो, ते पाहून आरोग्य यंत्रणा अव्वाक्‌ झालेली दिसत होती. बाळाला घेऊन बांबुळी गोव्याला जा सांगितले तर रेफरल कुठे आहे? ते तर हवे ना, ते दिसत नाही आणि आता बाळावर उपचार तर हवेतच ना, असे सांगितल्यावर नर्स मॅडम म्हणाल्या, रेफरल आम्ही देणार…देतोय..

      उपचार काय करावेत, यापेक्षा अचानक उद्भवलेल्या या उपटसुंभाला कसे थोपवावे, याचे प्रश्‍न चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होते.

      बाळाला कॉटवर घेण्यात आले. काही मिनिटात बालरोग तज्ज्ञ हजर झाले. त्यांना अवस्था सांगितली. बाळ सिरियस आहे म्हटल्यावर पुढचा प्रश्‍न आला. सिरियस म्हणजे काय? पास्ट मेडिकल हिस्ट्री माहिती नसल्याने मी निरुत्तर होतो. बाळा च्या नातेवाईकांना सांगा म्हटले. तेवढ्यात डॉक्टरांनी बाळाला तपासले. ऑक्सिजन लावला. 108 रुग्णवाहिकेला फोन लावा. रुग्णवाहिका बोलवा, असे सांगितल्याने संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू झाले. काही केल्या फोन लागेना. लागलाच तर उचलला जाईना. मग सुरू झाली रूग्णवाहिकेसाठीची धडपड.

         डॉक्टर म्हणाले, बाळ सिरियस आहे. ताबडतोब बांबुळीला न्या. आत्ता एक 108 रूग्णवाहिका उभी होती, त्यात घेतात का बघा. आशेचा किरण दिसला म्हणून रुग्णालयाबाहेर धाव घेतली. तिथे उभ्या रुग्णवाहिकेत अगोदरच एक महिला होती. तिला तपासून रूग्णवाहिकेतून बाहेर पडणाऱ्या तरुण डॉक्टरना विनंती केली. बाळ खूप सिरियस आहे. आत्ताच्या आता बांबुळीला नेणे आवश्‍यक आहे, कृपया घ्याल का? डॉक्टरनी नकार घंटा वाजवली. उत्तर बचावात्मक दिले. बाळाला इनफेक्शन होईल. अगोदरच पेशंट आहे. त्यावर म्हटले तसे असेल तर बाळाला रुग्णवाहिकेत पुढे घ्या, तरी नकार आला. नियमाने तसे करता येत नाही. बरेच प्रयत्न करून फोन लागत नाही म्हणून ही विनंती करतोय, पुढ्यात मोबाईलवर फोन लावूनही दाखवला. तरीही डॉक्टरांचे हृदय परिवर्तन झाले नाही. प्रयत्न करा लागेल, असे सांगून ते निघून गेले आणि ही अंधुक आशा मावळली.

      खटपट सुरू होती. 108ला फोन लागत नाही म्हटल्यावर नर्सना काहीतरी करा म्हटले तर त्यांनी एका वहीतून 108 रुग्णवाहिकेवरील व्यक्तीचा नंबर शोधायला घेतला. नंबर मिळाला, पण तो लागेना.

      त्यानंतर 102हेल्पलाईन ला फोन करण्यास सांगण्यात आले. तिथेही प्रतिसाद येईना. डॉक्टरनी वॉर्डबॉयला सांगितले, आपला ड्रायव्हर मिळतो का बघा. पण वार्डबॉय प्रश्‍नार्थक चेहऱ्याने कुठून तरी जाऊन परत आला. त्यामुळे आता हा देखील उपाय होत नाही, अशी बिकट अवस्था झाली.

         108 रूग्णवाहिकेला फोन करण्याचे सतत प्रयत्न सुरू होते. एक तर फोन लागत नव्हता किंवा लागलाच तर उचलला जात नव्हता. मग अटल प्रतिष्ठानच्या नकुल पार्सेेकर यांना फोन लावून हकिगत सांगितली. ते म्हणाले अटलची रुग्णवाहिका आहे, पण ड्रायव्हर नाही. तुम्हाला चांगला ड्रायव्हर मिळत असेल तर बघा म्हणाले. त्यावर थोड्या वेळात चर्चा करुन कळवतो सांगितले. तिथे उपस्थित बाळाच्या नातलगांशी चर्चा केली, डॉक्टरना कळविले. मात्र बाळाचे नातेवाईक म्हणाले प्रायव्हेट रुग्णवाहिकेला पैसे देण्या एवढी आमची परिस्थिती नाही. त्यावरही श्री. पार्सेेकर यांचेशी बोलून उपाय निघाला. तुम्ही काहीही देऊ नका, इंधन घालून रुग्णवाहिका घेऊन चला, असा दिलदारपणा पार्सेेकर यांनी दाखवला. ते बाळाच्या नातेवाईकांना मान्य झाले आणि ड्रायव्हरची शोधाशोध सुरू झाली.तो ही या नातेवाईकातून तयार झाला. पण डाँक्टर म्हणाले त्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन आहे ना? त्याची चौकशी पार्सेकरांकडे फोनवर केली तर तशी सुविधा नसल्याचे समजले. त्यामुळे हा पर्याय देखील चालेना.

         एवढ्यात 108 हेल्पलाईनवर फोन उचलला गेला. त्यांचे धडाधड प्रश्‍न सुरू होत होते, डॉक्टर म्हणाले फोन मला द्या. पलिकडून सतराशे साठ प्रश्‍नांचा भडीमार झाला. डॉक्टर शांतपणे उत्तर देत राहिले. त्यानंतर समोरून उत्तर आले रूग्णवाहिका सावंतवाडीजवळ डिझेल भरायला गेलीये. दहा मिनिटांत येईल. हे समजल्यावर सर्र्वांना हायसे वाटले. बाळाच्या आईचा, नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. तसा मी थोडा निश्‍चिंत होऊ लागलो. आता व्यवस्था होतेय म्हटल्यावर जरा कुठे दिलासा वाटला. तेवढ्यात नर्सने प्रश्‍न केला “तुम्ही कोण आहात, आरोग्य सेवक का?“ नाही म्हटल्यावर ते आणखीनच संभ्रमात पडले. मी आरोग्य सेवक नाही. रूग्णालयात येण्याचे प्रयोजन सांगितले. रूग्णालयातून बाहेर पडतांना ही मंडळी भेटली म्हणून त्यांच्या सोबत आत आलो. तसा मी अमुक अमुक आहे, पण इथे काम करत नाही. हे ऐकल्यावर नर्स बाईने तुम्हाला बरेचदा इथे बघितल्यासारखे वाटते, म्हटले. ज्या मृ़तदेहाच्या दर्शनाला आलो, तो रूग्णालयात आहे का नाही, याची माहिती दिली. एवढ्यात बाळाचे नातेवाईक डॉक्टरना ते सामाजिक कार्यकते आहेत, असा माझा परिचय करून देत होते. माझ्या अंगावर मुठभर मांस वाढल्यासारखे वाटले. मी विजयी योध्द्याच्या आविर्भावात रूग्णालयातून बाहेर पडलो. आता कदाचित सगळे ठिक होईल, ही भोळीभाबडी अपेक्षा त्यामागे होती. घरी आलो, तरी प्रसंग डोळयासमोरुन हलत नव्हता. रात्रीची झोप घेतली. सकाळी उठून काही कामानिमित्त एस.टी.स्टँड वर गेलो. नंतर घरी परतल्यावर आई म्हणाली, मगाशी तू बाहेर पडलास आणि मागून भटक्या समाजातील नागरिकांची अंतयात्रा गेली. त्यांच्या हातात जेमतेम दिड ते दोन वर्षाचे बाळ होते, हे ऐकून सुन्न झालो….

ती अंतयात्रा माझी, माझ्याच हतबलतेची होती…. की, पांढरपेशा समाजव्यवस्थेची…..?

  • हतबल सावंतवाडीकर

Leave a Reply

Close Menu