बदलती दिवाळी…आनंद तोच. पण बदलणारा

अनुभव म्हटल्यावर स्वतःच बालपण आलच आणि आपलं बालपण म्हटल्यावर गाव सुद्धा आलं. मग सुरूवात होतेय ती ३० वर्षांपूर्वीच्या गावच्या दिवाळीने! ५-६ वर्षांच वय जेव्हा समज यायला लागलेली.

      आमची दिवाळी सुरू व्हायची ती नरक चतुर्दशीलाच, वसुबारस ते धनत्रयोदशी आम्हा स्वधर्मियांना कळायला बराच अवधी गेला. जागतिकिकरणाचे वारे वाहत असतील कदाचित तेव्हा म्हणून संस्कृती विसरायला लागायची. गावंढळ म्हटलं तर कोणी उगाच. असो.

   पहाटे गजर लावून पाच साडेपाचला उठायचं. आदल्या दिवशी जमा केलेली पिशवीभर कारटाची फळं रवळीत भरून तुळशीकडे ठेवायचो. मग गोविंदा.. गोविंदाची आरोळी. थंडीने दाताला दात आपटायचे, ओरडताना पायाखालचं कारीट निसटून दूर जायचं आणि टाच फक्त जमिनीला आपटायची. ओट्यावरच्या लाकडी बाकड्यावर बसून माझी ही फजिती आमची आत्या गंमतीने बघायची. मला काही माहीतच नाही असं दाखवून दुसरं कारीट फोडायला घ्यायचो. पंधरा-वीस नरकासुर मेले की पाय दुखायला लागायचा आणि मग अंघोळीला जाण्याशिवाय पर्याय नसायचा. भयंकर थंडीवर चुलीच्या पेटत्या लाकडांचा आधार असायचा.  आता कारटांची संख्या कमी झाली. चुली सुद्धा कमी झाल्या आणि थंडी सुद्धा. आम्हाला जाग यायच्या आधी आईने तुळशीकडे लावलेली समई मात्र अजूनही तेवत असते.

          नंतर नारळाच्या रसात उटणं कालवून अंगाला चोळायचो. उटणं लावल्यावर साबण लावायचा नसतो असं आई बोलायची. मग नाईलाजाने नवा कोरा मोती साबण फक्त केसांना लावून गरम पाण्याची अंघोळ व्हायची. आता मात्र थंडी कुठल्या कुठे पळून जायची. आता नवलाई संपलीय, मात्र मोती साबण शिल्लक राहिलाय या सगळ्या गर्दीत.

      आता खरं दिव्य सुरू व्हायचं.पाट्यावर वाटून सातींग, कडुनिंब आणि आल्याचा रस काढला जायचा. अर्धा पेला पिल्यानंतर जमिनीवर चटई टाकून गडाबडा लोळावं लागायचं. आल्याचा रस उपाशी पोटात झोंबायचा की कधी एकदा पोहे खातो असं व्हायचं. आता पोहे तर खातोच, मात्र सातींग शास्त्रा पुरताच राहिलाय.

       पोहे आणि काळ्या वाटण्याची उसळी खाऊन चहा पिला की, दुहेरी शक्ती अंगात यायची. मग पावलं वळायची ती भेंडीच्या झाडावर चढून मोठी मोठी पाने काढायला. आमच्याकडे फराळाला येणा­या मंडळींना पोहे आणि उसळी भेंडीच्या पानातून देण्याची परंपरा आहे. चांगली चाळीस-पन्नास पाने लागायची. आता मात्र पंचवीस पानेसुद्धा जास्तच वाटतात. मात्र भेंडीच्या पानांची परंपरा टिकून राहिलीय याचाच आनंद.

      बाकी कुठे असं चालतं की नाही कल्पना नाही, मात्र आमच्याकडे वाडीतील वीस घराचे लोकं एकत्र सर्वांच्या घरी फराळाला येतात. कृष्णा काकाची हाक पार रस्त्यावरून प्रत्येक घराला जागं करत येते. आमचं घर पहिलंच असल्याने आमच्या घरी आलेल्या ज्येष्ठ मंडळींना पोह्याचा टिळा लावण्याची परंपरा आहे. कृष्णा काकाची हाक. दिवाळीच्या शुभेच्छा. पोह्याचा टिळा आणि भेंडीच्या पानातले पोहे अन उसळी सर्वकाही अजून जपलं गेलंय. नाही म्हणायला प्लास्टिकचे चमचे आणि चकल्या-अनारसे सारखा अधिकचा फराळ तेवढा वाढलाय.

      आधी सर्वांच्या घरी पोहेच असायचे ते सुद्धा भेंडीच्या पानातले. त्यामुळे पानातलं संपवण्याशिवाय पर्याय नसायचा. नाही म्हणायला एक पिशवी शिल्लक पोहे जमा करायला असायची. त्यात एखाद रताळं असलं तर मात्र शोधाशोध व्हायची. आता फराळाचं नावीन्य वाढलंय, पोह्यांच्या पलिकडे जाऊन ताटं वाढलीत. मात्र पिशव्या सुद्धा वाढल्याने बसायला वेळ कमी पडायला लागला. घाई घाईत का असेना प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी पाय लावायचं भाग्य मात्र अजूनही जपलं गेलंय.

      आता पोहे खाऊन यायची ती गाढ झोप. सकाळच्या अकाली लवकर उठायच्या प्रकरणाने. ती पार दुपारी जेवणासाठी उठवे पर्यंत. दुपारी ४ वाजता हक्काचं क्रिकेट झालं, की संध्याकाळी ७ वाजता गंमत असायची ती ओळीने पणत्या लावायची. मग लाईट बंद करून पणत्यांचा प्रकाश आणि त्यात डोकावणारा लालबुंद आकाशकंदील हे सौंदर्य अतुलनीय असायचं. आता पणत्या वाढल्यात, आकाशकंदील सुद्धा वाढलेत. दिवाळी वसुवारस पासून सुरू झाली ती पार तुळशीची लग्न होईपर्यंत साजरी होऊ लागलीय. संस्कृती टिकवली जातेय हाच एक मोठ्ठा आणि आनंददायी बदल. मेणबत्त्या आणि चांदण्या जवळपास हद्दपार झाल्यात. फक्त घराघरात आकाशकंदील बनविणारे हात मात्र कमी झालेत. शिकणारे सुद्धा अन् शिकवणारे सुद्धा.

      आता हायस्कूलला गेल्यावर हातात सायकल आलेली. दिवाळीच्या आदल्या दिवसाची जागा नरकासूर बनविण्यासाठीच्या जागरणाने कधी घेतली ते समजलंच नाही. शाळेला सुट्टी पडल्यावर आधी धाव घ्यावी लागायची ती थेट मळ्यात. गवत आणायला. ‘‘ता गोठ्यातला घेवन जाया‘‘ अशी परवानगी मिळाली की आठ दहा कार्यकर्ते त्या गवतावर तुटून पडायचे. एवढं लुटायचं की कदाचित एक अक्खा बैल उपाशी राहिला असता त्या गवताच्या दानाने. नरकासुर हा प्रदर्शनाची नसून जाळायची वस्तू आहे याची समज असल्याने त्यावर पाच-दहा रुपयाच्या दो­या वगळता संपूर्ण पणे ‘‘झिरो बजेट‘‘ नरकासूर करायचं कसब आम्हांला लाभलं होतं. तरीही त्यातून २-५ रूपयांच्या वर्गणीतून चार-पाचशे रूपये जमा व्हायचे. त्यातले दोनशे सहजपणे फटाक्यावर खर्च करण्यासारखी श्रीमंती आम्हाला अचानकपणे प्राप्त व्हायची. शिल्लक पैशातून भेळ आणि कोकाकोलाची खरेदी आणि त्यापुढेही जाऊन एखादा फुटबॉल घेण्याची आमची चैन वाढायची. मात्र एवढं जागरण करून दुस­या दिवशीच उठणं आणि उटणं कधीचं चुकलं नाही आम्हाला.

      आता नरकासुर मोठे झालेत.पार लॉरीमधून रंगीबेरंगी होऊन फिरू लागलेत. जागरण वाढू लागलीत. वाढत्या जागरणामुळे पोह्यासाठी काढलेली भेंडीची पाने शिल्लक राहू लागलीत आणि रेडिमेड आकाश कंदिलांची विक्री वाढू लागली.

      संध्याकाळी वेंगुर्ल्यातील लक्ष्मीपूजन बघायला सायकलवरून बाजारात फेरफटका मारायचो. मानसिश्वर मंदिराकडून रोषणाई सुरू व्हायची ती थेट रामेश्वराच्या तळ्यापर्यंत. रामेश्वराच्या तळ्यातील पणत्यांची आरास, मधोमध साकारलेला देखावा अप्रतिम असायचा. पुढे अधेमध्ये छोटे छोटे देखावे असायचे. भाजी मार्केटच्या गेटवर स्वामी समर्थ बसायचे. खूप मोठे. मधेच एखादा ओळखीचा दुकानवाला थांबवून बत्ताशी अन फुटाणे द्यायचा. आता रामेश्वराच्या तळ्यात तो प्रकाश पडत नाही. गल्लीबोळातील कलाकार आपापल्या प्रपंचात हरवले असतील, कदाचित त्याचमुळे आता भाजी मार्केटच्या गेट वर मोट्ठे स्वामी समर्थ बसत नाहीत.

       आधी दिवाळीसाठी ‘सुट्टी‘ पडायची. आता सुट्टीसाठी पाया ‘पडावं‘ लागतं.येण्याआधी जाण्याचं ठरवावं लागतं. कंदील बनविण्यापेक्षा कंदील आणणं सोपं वाटायला लागलायं. पणत्या मात्र वाढताहेत याचाच आनंद आहे. मनसेचा शिवाजी पार्कचा दीपोत्सव, अयोध्येचा दीपोत्सव त्यापासून वेंगुर्ल्याच्या मारूती मंदिराचा दीपोत्सव अशी ओळ वाढत चाललीय… प्रकाश देत.

   आता गरज आहे ती अजून थोडं जुनं होण्याची. गाई वासरांच्या पूजेपासून ते शेणाचा गोठा बनवण्यासाठी. पहाटेच्या गोविंदाच्या आरोळ्या देताना १५-२० कारिटांचा ढीग तुळशीपुढे जमविण्यासाठी. पोह्यांचा टिळा तर लागतच राहील, मात्र भेंडीच्या पानातून पोहे अन उसळ खाण्यासाठी… कंदील बनविताना हाताला चिकटणा­या गोंदासाठी… रामेश्वराच्या तळ्याला पुन्हा एकदा प्रकाशाने उजळून काढण्यासाठी..मार्केटच्या गेटवर बसलेले स्वामी समर्थ बघण्यासाठी… गावची दिवाळी अशी असायची अशा कथा न सांगता गावची दिवाळी अशीच असते असे अनुभव पुढच्या पिढीला देण्यासाठी.

गोविंदा……. गोविंदा……. गोविंदा. जय श्रीराम. 

– समीर मधुसूदन घोंगे, उभादांडा, वेंगुर्ला.९९६००३६१७४

Leave a Reply

Close Menu