कोकणातील गणेशोत्सव

        कोकणात गणपती म्हणजे फक्त दहा दिवसांचा सण नाही, तर तो वर्षभर मनात जपलेला एक सुंदर भावनिक सोहळा असतो. गणपतीची खरी सुरुवात गणेश चतुर्थीच्या दिवशी होतच नाही ती तर त्याच्या कितीतरी दिवस आधी गावच्या शाळेत, एखाद्या छोट्याशा खोलीत किंवा अंगणात मातीच्या गोळ्याला आकार देण्यापासून होते. माती आणली जाते, ती मळली जाते आणि मग हळूहळू त्या मातीमधून बाप्पांचा आकार साकारू लागतो. आजूबाजूला उत्सुक मुलांचा गराडा असतो. काका, कान मी करतो!, सोंड मला बनवू द्या!, मुकुटाला रंग मी देणार! अशा सूचना देत मुलं कारागिरांच्या मागे लागलेली असतात. कारागीर कितीही वेळा, अरे थांबा रे, आधी मूर्ती तयार होऊ द्या! असं म्हणाला तरी मुलं दोन मिनिटांनी पुन्हा त्याच्याजवळ येऊन उभी राहतात. त्या मातीच्या गोळ्याला हळूहळू कान, सोंड, हात, पाय, मुकुट आणि सुंदर चेहरा मिळतो आणि कालपर्यंत साधी माती असलेली ती मूर्ती अचानक आपल्या मनाला आपलीशी वाटू लागते.
      मग सुरू होतो रंग भरण्याचा सोहळा. लाल, पिवळा, गुलाबी, हिरवा अशा रंगांनी बाप्पांची मूर्ती सजू लागते. रंग देताना मुलांच्या अंगावरही रंग उडतो आणि मग बाप्पांच्या मूर्तीपेक्षा मुलांचे चेहरेच जास्त रंगीत दिसू लागतात! कोणाच्या हातावर रंग, कोणाच्या कपाळावर रंग आणि कोणीतरी गंमत म्हणून दुसऱ्याच्या गालावरही रंग लावलेला असतो. पण या सगळ्या गोंधळात जेव्हा शेवटी बाप्पांचे डोळे रंगवले जातात, तेव्हा वातावरणात अचानक एक वेगळीच शांतता निर्माण होते. कारण त्या क्षणी  ते आपले बाप्पा बनतात. त्या डोळ्यांत एक वेगळीच प्रसन्नता दिसते आणि प्रत्येकाच्या मनात नकळत भक्तीची भावना जागी होते.
           गणपती येणार म्हटलं की कोकणात घराची साफसफाई म्हणजे एखाद्या मोठ्या मोहिमेपेक्षा कमी नसते आणि मग येतो तो सर्वांत आनंदाचा दिवस बाप्पांच्या आगमनाचा दिवस! ‘गणपती बाप्पा मोरया!’ च्या जयघोषात बाप्पांचं घरात स्वागत होतं. आरती होते, फुलांचा वर्षाव होतो आणि बाप्पांना त्यांच्या स्थानावर विराजमान केलं जातं. त्या क्षणी घरात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. बाप्पा घरात आले की जणू घराच्या भिंतींनाही आनंद झालेला असतो. प्रत्येक जण बाप्पांकडे पाहतो आणि मनात एकच भावना असते, “बाप्पा, आमच्या घरात सुख, समाधान आणि आनंद कायम ठेव.”
       पुढचे दहा दिवस म्हणजे आनंदाचा महापूर असतो. भजनांच्या सुरांनी रात्ररात्र जागते. यातूनच एखादा कलाकार नावारूपास येतो. आरतीच्या वेळी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र येतात. ज्याला आरती पाठ नसते तो शेजाऱ्यांच्या आवाजावर ओठ हलवत असतो आणि टाळ मात्र इतक्या जोमाने वाजवत असतो की जणू संपूर्ण गावाची जबाबदारी त्याच्यावरच आहे! आरती झाल्यावर मात्र सगळ्यांचे लक्ष एका महत्त्वाच्या गोष्टीकडे असते प्रसाद कुठे आहे? आणि जर उकडीचे गरमागरम मोदक असतील तर मग बाप्पांच्या दर्शनापेक्षा प्रसादाच्या ताटाकडे पाहणाऱ्या मुलांची संख्या अचानक वाढते!
कोकणात गणपती म्हणजे नातेवाईकांच्या पुनर्मिलनाचा सोहळाही असतो. मुंबई, पुणे, नाशिक, गोवा किंवा परदेशात कुठेही असलेली माणसं गणपतीसाठी गावाकडे येतात. वर्षभर फोनवर बोलणारे लोक प्रत्यक्ष भेटतात. घरात गप्पा रंगतात, जुन्या आठवणी निघतात, लहान मुलांची ओळख मोठ्यांशी करून दिली जाते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. “अरे, किती मोठा झालास!, तुझं लग्न कधी?, मुलं किती?” अशा नेहमीच्या प्रश्नांपासून ते बालपणीच्या खोड्यांपर्यंत सगळं काही चर्चेत येतं. शहरातल्या धावपळीपासून दूर, मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा माणसांच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे हे दिवस असतात.
पण हे दहा दिवस कसे संपतात ते कळतही नाही. बाप्पांना निरोप देण्याची तयारी सुरू होते. कोणी सुखासाठी प्रार्थना करतं, कोणी आरोग्यासाठी, कोणी मुलांच्या भविष्यासाठी, तर कोणी फक्त एवढंच म्हणतं बाप्पा, पुढच्या वर्षी पुन्हा सगळ्यांना सुखरूप एकत्र आणा.  विसर्जनाची मिरवणूक निघते आणि मग तो क्षण येतो. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!” या घोषात बाप्पांना पाण्यात विसर्जित केलं जातं. तरीही मनात एक गोड समाधान असतं बाप्पांनी दहा दिवस आपल्याला आनंद दिला, आपली माणसं एकत्र आणली, घरात हसू आणलं आणि पुन्हा एकदा आपल्या मातीशी,  गावाशी आणि आपल्या माणसांशी जोडून दिलं.
             म्हणूनच कोकणचा गणपती हा केवळ धार्मिक सण नाही; तो एक भावना आहे, एक आठवण आहे, एक परंपरा आहे आणि आपल्या मातीशी जोडणारी नाळ आहे. तो आईच्या हातचा मोदक आहे, आजीच्या आवाजातील आरती आहे, बाबांच्या खांद्यावर बसून पाहिलेली मिरवणूक आहे, मित्रांसोबत केलेला दंगा आहे, गावच्या कट्ट्यावर रंगलेल्या गप्पा आहेत, पावसाने न्हालेल्या कोकणचा सुगंध आहे आणि शेवटी विसर्जनाच्या वेळी डोळ्यात आलेला एक हळवा अश्रू आहे. बाप्पा दहा दिवसांसाठी घरी येतात, पण त्यांच्या आठवणी मात्र पुढच्या गणपतीपर्यंत आणि कदाचित आयुष्यभर मनात राहतात.
           – विजय वेंगुर्लेकर (९९६९२५८६९७)

Leave a Reply