पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व घटकांसाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. आपणही आपल्या क्षमतेनुसार जिल्ह्यासाठी काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ला येथे केले.
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्यावतीने वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात ७ ऑक्टोबर रोजी सेवा ज्योती यात्रा अंतर्गत “विकसित भारत संकल्प सभा” संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सेवा ज्योती यात्रा जिल्हा संयोजक संदीप मेस्त्री, डॉ. मिलिंद कुलकर्णी, युवराज लखमराजे भोसले, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, पं.स.सभापती शंकर घारे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, महेश सारंग, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर यांच्यासहित जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले की, महिला, शेतकरी, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी केंद्र सरकारने विविध माध्यमातून मोठे काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिक व सामाजिक विकास साधायचा असेल तर सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. सरकार, आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी विकासासाठी आपल्या पाठीशी आहेत. मात्र त्यासाठी कार्यकर्त्यांची एकजूट आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, समाजासाठी, पक्षासाठी आणि देशासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणे हीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची खरी ओळख आहे. ही प्रेरणा आपल्याला मिळते ती नेतृत्वाकडून. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जवळपास पंचवीस वर्षांचा प्रशासनाचा आणि सार्वजनिक सेवेचा प्रवास आपल्या समोर आहे. खासदार राणे यांनी गेल्या चार दशकांमध्ये या जिल्ह्यासाठी, कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले आहे, ते अत्यंत समर्पित भावनेने दिलेले आहे. त्यांच्या कार्यातूनही आपल्याला सेवाभाव आणि समर्पणाची प्रेरणा मिळते. आपणही त्याच भावनेने पुढे गेले पाहिजे. पक्षाचे काम करताना पद, प्रसिद्धी किंवा व्यक्तिगत अपेक्षा न ठेवता संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी काम करण्याची वृत्ती प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सेवा ज्योती यात्रेबद्दल जिल्हा संयोजक संदीप मेस्त्री यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले. तर आभार नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी मानले.
वेंगुर्ल्यातील या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि उत्साह पाहून आपण प्रभावित झाल्याचे सांगत खासदार नारायण राणे म्हणाले, “तुमच्यातील ही एकजूट प्रत्येक कामात आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात कायम दिसली पाहिजे. या एकजुटीतूनच जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेता येईल.” आयोजनाबद्दल जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, वेंगुर्ला भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्यासहित तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
