वेंगुर्ला शहरातील शिरोडा नाका, दाभोली नाका ते वेंगुर्ला बंदर रोडवर वाहनांचा वेग कमी करण्याच्या उद्देशाने रंबलर्स बसविण्यात आले आहेत. मात्र, या रंबलर्समुळे विशेषतः छोट्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांना वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे वाहनांची दुरवस्था होत असून, वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांवरील रंबलर्स तात्काळ हटविण्यात यावेत, अशी मागणी जुना स्टँड येथील जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, वेंगुर्ला शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सुशोभीकरणाच्यादृष्टीने पथदीप बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचा पुरेपूर उपयोग व्हावा आणि शहराचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी हे दिवे दररोज सायंकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक नागेश गावडे, विकी गावडे, कृष्णा गावकर, अनुप गावडे, गोट्या गावडे, सुमित गावडे, विकास कोरगावकर, गौरव गिरप, दीपेश गावडे, रोशन गावडे, सतेज मयेकर, महेश गावकर, जगन्नाथ खवणेकर, गिरीष मांजरेकर, मंदार गावडे यांसह हनुमान मंडळाचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
