सिंधुदुर्गचे पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला न.प.ला भेट

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान तथा कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव विरेंद्र सिंह यांनी २३ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेस भेट देऊन शहरात राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण विकासकामांची पाहणी केली.
या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपविभागीय अधिकारी-सावंतवाडी, वेंगुर्ला तहसीलदार तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर तसेच नगरसेवक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान विरेंद्र सिंह यांनी नगरपरिषदेने नव्याने विकसित केलेल्या नमो उद्यानाची पाहणी केली. उद्यानामध्ये साकारण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण सुविधांची व वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर नगरपरिषद कार्यालयास भेट देऊन स्वामी विवेकानंद शालेय कौशल्य विकास लॅबला भेट दिली. तसेच रोबोटिक्स लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक कौशल्यविकास सुविधांची माहिती घेतली. लगतच्या अभ्यासिकेमध्ये आयोजित बैठकीत नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण विकासकामांचा आढावा घेण्यात आला.नगरपरिषदेच्या प्रस्तावित डिजिटायझेशन प्रकल्पाबाबतही त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पाचे सादरीकरण मुंबई येथे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. वेंगुर्ला शहरातील सांडपाण्याच्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

Leave a Reply