शहरातील रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागा या वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षित येण्या-जाण्यासाठी असतात की मोकाट जनावरांच्या मुक्त वावरासाठी, असा संतप्त सवाल आज सर्वसामान्यांना पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांप्रमाणेच निसर्गरम्य वेंगुर्ला शहरालाही मोकाट जनावरांच्या आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येने ग्रासले आहे. बाजारपेठ, वर्दळीचे चौक आणि मुख्य रस्ते यावर रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणारी गुरे, अचानक वाहनांसमोर येऊन निर्माण होणारा अपघाताचा धोका आणि कळपाने फिरणारे, नागरिकांवर धावून जाणारे व चावा घेणारे मोकाट कुत्रे, हे आता नित्याचेच चित्र बनले आहे. वेंगुर्ला हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर अशी वेंगुर्ल्याची ओळख अधिक बळकट व्हावी, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहराच्या रस्त्यांवर मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचे कळप दिसत असतील, तर त्यामुळे पर्यटकांसमोर शहराची चुकीची प्रतिमा उभी राहते आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. विशेषतः दुचाकीस्वार, पादचारी, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसतो. रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर बसलेली गुरे वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाहीत, त्यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता नेहमीच राहते.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत वेंगुर्ला नगरपरिषदेने मोकाट गुरांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी आढळणारी गुरे पकडून गोशाळेत हलविणे, रात्री अपघात टाळण्यासाठी गायी-वासरे आणि बैलांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावणे आणि मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देणे, ही प्रशासनाने उचललेली स्वागतार्ह पावले आहेत. परंतु, धोरणे किंवा मोहिमा जाहीर करणे आणि प्रत्यक्ष जमिनीवर त्यातून बदल घडवून आणणे यामध्ये मोठी दरी असल्याचे दिसून येते. मोहीम राबवूनही शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर कायम आहे. सण-उत्सवांच्या काळात, विशेषतः गणेशोत्सवात चाकरमान्यांची आणि वाहनांची वर्दळ वाढल्यावर बाजारपेठेत वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका अधिकच तीव्र होतो. त्यामुळे या मोहिमांचा अपेक्षित परिणाम का साधला जात नाही, याचा गंभीर आढावा घेणे आवश्यक आहे.
या समस्येसोबतच मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्नही तितकाच संवेदनशील आणि गंभीर आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी निर्बीजीकरण (स्टेरलायझेशन) आणि लसीकरणाची उपाययोजना राबवली जाते. मात्र, या मोहिमांमध्ये सातत्य नसल्यास काही काळातच पुन्हा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. निर्बीजीकरण मोहीम केवळ कागदावर किंवा ठराविक कालावधीपुरती न राहता, ती नियमितपणे, नियोजनबद्ध पद्धतीने आणि ठोस लक्ष्यांसह राबवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच लसीकरण आणि भटक्या श्वानांच्या संख्येची नोंद ठेवण्याची यंत्रणाही सक्षम असायला हवी.
मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे केवळ नगरपरिषदेची जबाबदारी म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. जनावरे पाळणाऱ्या मालकांनी आपली सामाजिक व कायदेशीर जबाबदारी ओळखली पाहिजे. केवळ दुग्धव्यवसाय किंवा अन्य कारणासाठी गुरे पाळायची आणि त्यांच्या निवाऱ्याची, चारा-पाण्याची पुरेशी सोय न करता त्यांना रस्त्यावर मोकाट सोडून द्यायचे, ही वृत्ती तातडीने बदलणे गरजेचे आहे. सार्वजनिक रस्ते हे जनावरे सोडण्याचे कुरण नाहीत. मालकांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव धोक्यात आला किंवा अपघात घडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने आणि संबंधितांनी द्यायलाच हवे.
दुसरीकडे, पकडलेल्या गुरांना गोशाळेत हलवताना तेथे पुरेशी जागा, चारा, पाणी, वैद्यकीय सेवा आणि देखभालीची सक्षम व्यवस्था असणे तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ गुरे पकडून नेणे म्हणजे प्रश्न सुटला असे होत नाही, त्यांचे पुढील व्यवस्थापन आणि संगोपनही मानवी संवेदनशीलतेने आणि नियोजनबद्ध रीतीने होणे आवश्यक आहे.
शहराचा सर्वांगीण विकास म्हणजे केवळ रस्ते, गटारे, दिवाबत्ती किंवा सुशोभीकरणाची कामे नव्हेत. नागरिकांना कोणत्याही भीतीशिवाय रस्त्यावरून चालता येणे, वाहन चालवताना जीव मुठीत धरावा न लागणे आणि सार्वजनिक जागांचा सुरक्षित वापर करता येणे, ही विकासाची खरी कसोटी आहे. वेंगुर्ल्यासारख्या पर्यटननगरीत तर या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमामध्ये सातत्य, कठोर अंमलबजावणी आणि नियमित आढावा यांची जोड मिळायला हवी. त्यासाठी नगरपरिषद प्रशासन, जनावरांचे मालक, प्राणीमित्र संस्था आणि जागरूक नागरिक या सर्वांनीच आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ रस्त्यांवरील वावराचा विषय नसून, तो नागरी नियोजनाचा, सार्वजनिक शिस्तीचा आणि मानवी सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी आणि
परिणामकारक तोडगा निघणे, ही खरी गरज आहे.
