वीज समस्यांबाबत शिवसैनिक आक्रमक

पावसाळा सुरू झाला तरी वेंगुर्ला तालुक्यात विद्युत मंडळाने कोणतीही मान्सूनपूर्व कामे पूर्ण केलेली नाहीत. परिणामी, अनेक ठिकाणी विद्युत तारांवर फांद्यांचा धोका असून वेंगुर्ला तालुक्याला दीर्घकाळासाठी अंधारात रहावे लागण्याची शक्यता आहे. अधिकारी केवळ पगारापुरतेच कार्यालयात येत असतील तर त्यांना शिवसेना स्टाईल दाखवू असा सज्जड इशारा वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे देण्यात आला.
वेंगुर्ला येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयात विद्युत अभियंत्यांना घेरावा घालून शिवसैनिकांनी  वेंगुर्ल्यातील वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत जाब विचारला. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका लीना म्हापणकर, समिधा रेडकर, पंचायत समिती सदस्य साक्षी नार्वेकर, माजी सभापती सुनिल मोरजकर, माजी पदाधिकारी बाळा दळवी, स्वप्नील गावडे, मितेश परब, संतोष परब, पंकज शिरसाट, अजित राऊळ, सत्यवान साटेलकर, शैलेश नार्वेकर, उभादांडा उपसरपंच टिना आल्मेडा यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
विद्युत खांबांवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वायरमन यांना अद्यापही सुरक्षा किट देण्यात आलेले नाही. शिवाय असंख्य ठिकाणी विद्युत खांब व विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत. वादळी पाऊस झाल्यास वेंगुर्ल्यात मोठी गैरसोय होऊ शकते. याचा विचार करून आत्ताच आवश्यक ती सामुग्री तसेच नवीन फ्युज उपलब्ध करून ठेवावेत, विद्युत पुरवठा सुरळीत नसताना थकित विज बिलांसाठी विद्युत मंडळांच्या कर्मचाऱ्यांकडून दादागिरी होत असेल तर खपवून घेणार नाही. वेंगुर्ल्यातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी तात्काळ जिल्ह्रातील मुख्य अभियंत्यांना वेंगुर्ल्यात उपस्थित करा अशा विविध मागण्या यावेळी शिवसैनिकांनी केल्या. या मागण्यांचे निवेदनही अधिकाऱ्यांना सादर केले.

Leave a Reply