डेरवण येथील वालावलकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अंतर्गत २०२४ मध्ये स्थापन केलेल्या ‘सीव्हीआरएस फिटनेस ओपीडी’ विभागाने अल्पावधीतच आरोग्यसेवेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेषतः हृदय आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या फिटनेस मूल्यांकनासाठी हा विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आजार बळावत असताना, सीव्हीआरएस फिटनेस ओपीडी पुराव्यावर आधारित म्हणजेच संपूर्ण तपासणी नंतर फिजिओथेरपी आणि व्यायाम कार्यक्रमांच्या माध्यमातून रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे. या विभागाचा मुख्य उद्देश केवळ उपचार करणे नसून, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा देऊन आजारांना दूर ठेवणे हा आहे. अशी माहिती या विभागाच्या डॉ. आस्मा शर्मा यांनी सांगितले.
या ओपीडीमध्ये कार्डियाक आणि पल्मनरी रिहॅबिलिटेशनसह वजन व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. रुग्णांचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी हा विभाग सज्ज असून, यामध्ये बीएमआय आणि वेस्ट-हिप रेशो,स्नायू शक्ती आणि लवचिकता चाचणी, मॉडिफाईड हार्वर्ड स्टेप टेस्ट, सिक्स-मिनिट वॉक टेस्ट या विशेष चाचण्या केल्यानंतरच प्रत्येक रुग्णाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘वैयक्तिकृत व्यायाम कार्यक्रम’ तयार केला जातो, जो त्यांच्या जलद रिकव्हरीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
केवळ ओपीडी स्तरावरच मर्यादित न राहता समुदाय पातळीवरही मोठी जनजागृती करत आहे. जागतिक हृदय दिन, जागतिक तंबाखूमुक्त दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष उपक्रम राबवून आरोग्य शिक्षणाचा प्रसार केला जातो. तसेच, मोफत फिटनेस स्क्रिनिंग, व्यायाम प्रात्यक्षिके आणि श्वसन व्यायाम कार्यशाळांमधून नागरिकांना निरोगी राहण्याचे मंत्र दिले जातात.
या ओपीडीच्या नियमित सेवांमुळे रुग्णांची हृदय आणि श्वसन कार्यक्षमता सुधारण्यास मदत होत आहे. शारीरिक सहनशक्ती वाढणे, स्नायूंची ताकद बळकट होणे, वजन नियंत्रण आणि ताणतणाव कमी होऊन निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास रुग्णांना मोठी मदत होत आहे. अशी माहिती डॉ. आस्मा शर्मा यांनी दिली.
सीव्हीआरएस फिटनेस ओपीडी हा पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत आहे. सर्वांगीण मूल्यांकन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे हा विभाग आरोग्य क्षेत्रात एक मोलाचे योगदान देत आहे. जे नागरिक आपल्या आरोग्याबाबत जागरूक आहेत, त्यांनी या सुविधेचा नक्कीच लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.
सन २०२४ मध्ये ५०००, सन २०२५ मध्ये ६०१२ तर सन २०२६ मध्ये २६९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
