►किराणा ३५ टक्क्यांनी महागला

यावर्षी १ जानेवारी ते ८ सप्टेंबर या नऊ महिन्यांत तूर, मूग, उडीद, वाटाणा, चणाडाळ, मसूर डाळींसह ज्वारी, बाजरी आणि गहू आदी किराणा वस्तूंच्या दरात मुंबई एपीएमसीसह राज्यातील घाऊक बाजारपेठांमध्ये तब्बल ३५ टक्क्यांची दरवाढ झाली आहे. इराण-रशिया युद्धामुळे सागरी मार्गाने होणारी आयात एप्रिल ते जून अखेरपर्यंत ठप्प होती. त्यात परराज्ये आणि महाराष्ट्रातील डाळींसह गहू, ज्वारी, बाजरी, मका पिकाचे उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यात झालेला कमी पाऊस आणि इंधन दरवाढीमुळे किराणा मालाचे दर भडकले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने पॅकिंग केलेल्या अनब्राँडेड अन्नधान्य, डाळींवरही ५ टक्के जीएसटी लागू केल्याने अन्नधान्य व डाळींच्या दरवाढीत ८ ते १२ टक्क्यांनी भर पडली आहे. किरकोळ व्यापारी घाऊक बाजारातील खरेदी केलेला माल हा किराणा दुकानात खुल्या पद्धतीने विक्री करतो. त्यामुळे ग्राहकांची पाच टक्के जीएसटी बचत होत असली तरी किलोमागे १५ ते २५ रूपयांचा भुर्दंड मात्र सोसावाच लागत आहे.

Leave a Reply