►नवरात्रौत्सवानिमित्त फिटनेस मिशन

नागरिकांमध्ये नियमित व्यायामाची सवय निर्माण करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने वेंगा फिटनेस फायटर क्लब, वेंगुर्लेच्यावतीने आणि रांगणा-रागिणी रनर्स क्लब, सिंधुदुर्ग आणि फ्रायडे फिटनेस क्लब, मुंबई यांच्या सहकार्याने नवरात्रौत्सवानिमित्त ‘९ × ९ मिशन’ या फिटनेस उपक्रमाची चौथी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाची नोंदणी १० सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, मागील दोन वर्षात या उपक्रमातील सहभागात तब्बल १७५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
              ‘९ × ९ मिशन’ अंतर्गत नागरिकांनी नवरात्रौत्सव काळात सलग नऊ दिवस नियमित व्यायाम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दररोज किमान आले ४५ मिनिटे चालणे किंवा धावणे, हा या उपक्रमाचा मुख्य भाग आहे. मात्र, हा उपक्रम स्पर्धेपेक्षा फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीवर केंद्रित असल्याने सहभागी स्पर्धक आपल्या क्षमतेनुसार किमान ३ ते कमाल ९ किलोमीटरपर्यंत चालू किंवा धावू शकणार आहेत. ‘९ × ९ मिशन’चे वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम पूर्णपणे व्हर्चुअल स्वरूपाचा आहे. त्यामुळे सहभागी स्पर्थक आपल्या सोयीच्या ठिकाणी आणि वेळेनुसार या फिटनेस चळवळीत सहभागी होऊ शकतील. चालणे किंवा धावण्याबरोबरच सायकलिंग, पोहणे अथवा कोणताही व्यायाम करून त्याची नोंद आयोजकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवावी लागणार आहे. सहभागींच्या नऊ दिवसांच्या कामगिरीची नोंद शो कार्डवर करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने नियमित व्यायामाची सवय निर्माण करण्याबरोबरच सहभागींच्या सातत्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या उपक्रमा मध्ये नोंदणीकृत सहभागीला ९×९ मिशनचा टी-शर्ट, आकर्षक पदक आणि ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उपक्रमाच्या समारोपानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, मान्यवरांच्या हस्ते सहभागींच्या पदकांचे वितरण करण्यात येणार आहे.
             गेल्या दोन वर्षांत या उपक्रमाच्या सहभागात झालेली १७५ टक्के वाढ ही नागरिकांमध्ये फिटनेसविषयी वाढत असलेल्या जागरूकतेचे द्योतक मानली जात आहे. यंदाच्या या उपक्रमाच्या चौथ्या वर्षी ही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन या आरोग्यदायी चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजक वेंगा फिटनेस फायटर, तसेच सहकार्य करणारे रांगणा-रागिणी रनर्स क्लब आणि फ्रायडे फिटनेस क्लब, मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे. नोंदणीसाठी व्ही. प्रदीप (७४२०८०८४१६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply