►भूजल पुनर्भरणासाठी शेतकऱ्यांना मदत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि त्याचे दूरगामी परिणाम रोखण्यासाठी ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ने काही गावांमध्ये ‘भगीरथ शेततळे योजना’ सुरू केली आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीवर शेततळे खणून पाणलोट क्षेत्राचे छोटे युनिट तयार करावे, असा या योजनेचा उद्देश आहे.
शेतकऱ्याने स्वतःच्या विहिरीच्या वरच्या भागात कृषी अधिकारी किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेततळ्याची जागा निश्चित करावी. त्या जागेचा जीपीएस लोकेशनचा फोटो काढून ‘भगीरथ’ला पाठवावा. अंदाजे ४० × ४० × १० फूट आकाराच्या शेततळ्यासाठी जेसीबी १२ ते १५ तासात काम पूर्ण करते. ताशी भाडे सुमारे १,१०० रुपये असल्याने एकूण खर्च १३,२०० ते १६,५०० रुपये येतो. काम पूर्ण झाल्यानंतर उरलेली रक्कम ‘भगीरथ’ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करेल. यापेक्षा मोठे शेततळे केल्यास कमाल १०,००० रुपयांचे अनुदान मिळेल. याहून जास्त अनुदान कोणालाही दिले जाणार नाही.या शेततळ्यामुळे सुमारे ४ लाख लिटर पाणी साठेल. पावसाळ्यात ५ ते ६ वेळा तळे भरून पाणी भूगर्भात जिरेल. म्हणजे अंदाजे २५ लाख लिटर पाणी जमिनीत जिरून २ ते ३ वर्षांत तळ्याखालील माती सुपीक (पापुद्रा) होईल. अशा प्रकारे पाणी साठवण आणि जिरवण या दोन्ही प्रक्रिया एकत्र होतील. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पूर्ण नाव, गाव, वाडी आणि मोबाइल नंबर यासह माहिती गणेश भाटकर (९३७००२०८४५) किंवा संपदा राणे (७३७८५०४९१९) या क्रमांकांवर पाठवावी. नावे निश्चित झाल्यानंतर ‘भगीरथ’मध्ये एक कार्यशाळा आयोजित केली जाईल. त्यात प्रत्यक्ष शेततळ्याचे काम पाहण्याची आणि त्यामागील विज्ञान-तंत्रज्ञान समजावून सांगण्याची संधी मिळेल.

Leave a Reply