
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध केंद्रांवर सुरू झाली आहे. राज्यभरात एकूण ५४२ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतलेल्या या महानाट्य स्पर्धेच्या सिंधुदुर्ग केंद्रावरील स्पर्धेला १९ नोव्हेंबरपासून मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सुरुवात होणार आहे. तर वेंगुर्ल्यातील मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात ३० नोव्हेंबरपासून ११ दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होणार आहे. सिंधुदुर्ग केंद्रावरील २२ नाट्यसंस्थांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे समारोपाचे नाटक १० डिसेंबर रोजी सादर होईल.
दि. ३० नोव्हेंबर रोजी सायं. ७ वा. वेंगुर्ला केंद्रावरील प्राथमिक फेरीला प्रारंभ होईल. तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे आबा पेडणेकर लिखित आणि राजेश गोवेकर दिग्दर्शित ‘अर्धी मस्ती अर्धा ढाँग’, दि.१ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. श्री तारादेवी भगवती ब्राह्मण धाडवस महादेव पंचायतन केळूस सेवा समिती, मुंबई या संस्थेचे सुहास भोळे लिखित आणि प्रदीप होडावडेकर दिग्दर्शित ‘हुकुमी एक्का’, दि.२ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. श्री ओंकार पारंपरिक लोककला दशावतार नाट्य मंडळ म्हापण या संस्थेचे साईनाथ नेरुरकर लिखित व दिग्दर्शित ‘पट्टी’, दि.३ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. जीवनदायी विकास संस्था वेंगुर्ला या संस्थेचे रामचंद्र कुलकर्णी लिखित आणि रमेश नार्वेकर दिग्दर्शित ‘ड्रेस ऑफ द एंपरर’, दि. ४ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. परुळे युवक कला क्रीडा मंडळ या संस्थेचे प्रथमेश नाईक लिखित व दिग्दर्शित ‘ऐसे काही व्हावे’, दि.५ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. कलावलय या संस्थेचे योगेश सोमण लिखित आणि सुरेंद्र उर्फ बाळू खांबेकर दिग्दर्शित ‘केस नंबर ९९’, दि.६ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. सातार्डा मध्यवर्ती संघ या संस्थेचे विजय चव्हाण लिखित आणि रामचंद्र कवठणकर दिग्दर्शित ‘शबय’, दि. ७ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा, वेंगुर्ला या संस्थेचे विजय खानविलकर लिखित आणि सिद्धेश सावंत दिग्दर्शित ‘हणम्याची मरीआय’, दि. ८ रोजी सायं. ७ वा. इंद्रधनु कला मंच, दाभोली या संस्थेचे ऋषी देसाई लिखित आणि संजय नागडे दिग्दर्शित ‘चाकर’, दि. ९ रोजी सायं. ७ वा. आनंदयात्री वाङमय मंडळ, वेंगुर्ला या संस्थेचे प्रसाद खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘प्लॅटफॉर्म नंबर शून्य’ हे नाटक सादर होणार आहे. दि.१० डिसेंबर रोजी सायं. ७ वा. कणकवली येथील अक्षरसिंधू साहित्य कलामंच सिंधुदुर्ग या संस्थेचे विजय चव्हाण लिखित आणि सुहास वरुणकर दिग्दर्शित ‘धयकालो’ हे नाटक समारोपाला सादर होणार आहे.
या संपूर्ण स्पर्धेसाठी तिकीट दर १५ रुपये व १० रुपये असा ठेवण्यात आला आहे. गेली सलग तीन वर्षे वेंगुर्ले केंद्रावर राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची नाटके सादर होत असून दरवर्षीच या स्पर्धेला वेंगुर्ल्यात हाऊसफुल्लचा प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकच केंद्र होते. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग हे स्वतंत्र नवीन केंद्र निर्माण झाल्याने जिल्ह्यातून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नाट्य रसिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
