गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु…

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:, गुरुर्देवो महेश्वर:|
गुरुर्साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः॥
      गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, आदरणीय अवस्था असते. गुरुपूजन ही प्रदीर्घकालीन भारतीय परंपरा आहे. ज्ञानाचा वारसा गुरु- शिष्य परंपरेने पिढ्यानपिढ्या सुरू राहतो. ही परंपरा नसेल तर हा ज्ञानाचा प्रभाव कुठल्याही क्षणी खंडित होऊ शकतो. भारताच्या इतिहासात ही परंपरा भगवान वेदव्यासांपासून सुरू झालेली दिसते. व्यास हे महाभारताचे  कर्ते. त्यांनी एक प्रचंड ऐतिहासिक कालखंड या ग्रंथातून समग्रपणे मांडला आहेच. पण त्या ओघात शेकडो विषयांचे विवेचनही केले आहे. एकप्रकारे महाभारत म्हणजे भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोषच आहे.
‘गुरुविना मार्ग नाही’ असे म्हटले जाते आणि ते निर्विवाद सत्य आहे. माणसाला सुसंस्कृती, जीवनात सफलता आणि मोक्ष प्राप्तीसाठी गुरुचरणी लीन व्हावे लागते.
          महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि  मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्रही आहे.
ज्ञानाचा वारसा असा समृद्धपणे पुढे पोहोचविणाऱ्या गुरुबद्दल शिष्यांना वाटणारी कृतज्ञता ही एक मोठी उदात्त भावना आहे. आणि म्हणूनच ती व्यक्त करण्यासाठी शिष्याला गुरुपूजन करावेसे वाटणे स्वभाविक आहे. यातूनच गुरुपूजनाची प्रथा पडली.  व्यास महर्षी हे आपले परमगुरु असल्यामुळे त्यांच्या जन्मदिनी म्हणजे आषाढ पौर्णिमेला गुरुपूजन करण्याचा प्रघात रूढ झाला. म्हणून या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. समाजात ही पौर्णिमा विविध पद्धतीने साजरी केली जाते.
‘ गिरति अज्ञानम् इति गुरु।’
अज्ञान दूर करतो तो गुरु!आचार्य, उपाध्याय, ज्येष्ठ, श्रेष्ठ, उपदेशक, शिक्षक हे सारे गुरुस्थानीच आहेत. नामचिंतामणी या ग्रंथात तर गुरुंचे १२ प्रकार सांगितले आहेत. धातूवादी गुरु, चंदन गुरु, परिस गुरु, कच्छप गुरु, चंद्र गुरु, दर्पणगुरु, विचार गुरु, छायानिधी गुरु, नादनिधी गुरु, क्रौंच गुरु, सूर्यकांत गुरु. गुरुची ज्ञान देण्याची आणि शिष्याची ज्ञान घेण्याची इच्छा उत्कट असली म्हणजे किती विविध प्रकारांनी ज्ञानाचे संक्रमण होऊ शकते, याचे हे निदर्शक आहे.
श्री दत्तात्रयांनी २४ गुरु केल्याचे ख्यात आहे. समर्थ रामदासांनी मंत्र गुरु, यंत्र गुरु, वस्ताद गुरु आदी गुरुंचे १७ प्रकार सांगितले आहेत. गुरु शब्दांमधील ‘ग’कार हा सिद्धी देणारा,’र’ कार पापहरण करणारा, ‘उ’कार हा विश्वरूप मानला जातो. मानवी जीवनात गुरुला फार मोठे स्थान आहे. गुरुविषयीचा आदरभाव आणि श्रद्धा जोपासली तर कोणत्याही संकटातून निभावून जाण्याची शक्ती मनुष्यात निर्माण होते. एकलव्याने तर गुरु द्रोणांची मृण्मयमूर्ती तयार करून धनुर्विद्येने ज्ञान प्राप्त केले. आपल्या सश्रद्ध भावनेने त्या मृण्मय मूर्तीत त्याने चैतन्य पाहिले आणि धनुष्याचा प्रत्यंचा ओढण्याचे कसब लिलया प्राप्त केले. गुरुशिवाय मार्ग नाही याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो. खेळाडू, कलावंत आदींचा वंदनीय गुरु असतोच. याची अनेक उदाहरणे आजही आपल्यासमोर आहेत. म्हणूनच गुरुचरणी लीन होताना गुरुपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. ‘नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ कधी शोधू नये’ असे म्हटले आहे. त्याचे कारण गुरुपासून आपण घ्यायचे ते फक्त ज्ञान, आचार- विचार कारण गुरुला ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच परब्रह्माची उपमा दिली जाते.
         आपल्या संस्कृतीत उपनिषद काळापासून गुरुचे महत्त्व प्रतिपादन केलेले दिसते. गुरु ही पूर्वी पारंपरिक संस्था होती. गुरुकुलाची मोठी परंपरा होती. कृष्ण-बलराम सांदिपनींच्या गुरुकुलात शिकले.
      राम-लक्ष्मणांनी विश्वामित्रांकडून धनुर्विद्या संपादन केली. धौम्य-आरुणी, द्रोणाचार्य-अर्जुन, संत निवृत्तीनाथ- संत ज्ञानेश्वर, जनार्दन स्वामी-संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस- स्वामी विवेकानंद अशा गुरु-शिष्यांच्या जोड्या अजरामर आहेत. गुरु उत्तम ज्ञानी,शांत,दान्त (संयमी), शुद्ध वेशवान, आचारशील, सुप्रतिष्ठीत, ज्ञाननिष्ठ, मंत्र- तंत्र विशारद, निग्रह- अनुग्रह करण्याचे सामर्थ्य असलेला असा असावा. असा गुरु लाभणे हे महदभाग्यच! अर्थात त्यासाठी शिष्यही आर्त, जिज्ञासू, विनम्र, कष्टाची तयारी असलेला हवा.
भक्तीत श्रद्धा हवी, श्रद्धेत वास्तवतेचे भान हवे. पोटार्थी, भोंदू, शिष्यांना फशी पाडणारे असे गुरुपदाचे अवमूल्यन करणारेही गुरू असतात. अशा गुरुंना दूर ठेवावे. त्यांच्या सान्निध्यात राहू नये असे समर्थ सांगतात. असले गुरु गुरुसंस्थेलाच बदनाम करतात. ‘सद्गुरु वाचोनी सापडेना सोय’ म्हणून ज्ञानासाठी तळमळणारे शिष्य गुरूच्या शोधात कष्टप्रद प्रवास करतात. ते सापडलेच तर त्यांच्या कठोर परिक्षांना उतरून लखलखीत ज्ञानाचे, कलागुणांचे धनी होतात. भक्तीभावाने ज्यांचे पाय धरावेत असे गुरु मानवी रूपात सापडतातच असे नाही. मग काहीजण परमेश्वराच्या ठिकाणी
गुरुशरण होतात. संत महाम्यांना गुरु मानतात. विठ्ठलाचे पायी माथा टेकतात. ग्रंथांना गुरु मानून ज्ञानोपासना करतात. ज्ञानसंपन्न, निरहंकारी, प्रेरक गुरु आणि जिज्ञासू, प्रयत्नशील, कृतज्ञ शिष्य असलेला सुरेल योग  जेव्हा जुळून येतो तेव्हा त्या त्या क्षेत्रातील ज्ञानपरंपरा ही उजळून निघते, समृद्ध होते, विकसित होत पुढे पुढे जाते. अशी नाती आदर्श ठरतात. ती त्या गुरुशिष्यापुरतीच मर्यादित राहत नाहीत. ती अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरतात. अशासाठी गुरुपौर्णिमेसारख्या परंपरा जागरूकपणे सांभाळल्या गेल्या पाहिजेत, उलगडून सांगितल्या गेल्या पाहिजेत. याच आधारावर संस्कृतीचा बहुमोल ठेवा आपल्याला जतन करता येईल.
गुरुला देवाची उपमा दिली आहे म्हणूनच गुरुमध्ये देवत्व शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. संकुचित विचाराने ऐहिक वैभवाच्या राशीवर लोळणाऱ्या गुरुपेक्षा कैवल्याचा मार्ग ज्ञात करून देईल, जो मार्ग आपल्याला अभिप्रेत असेल. फक्त श्रद्धा आणि अंधश्रद्धा, स्वार्थ आणि परमार्थ ओळखण्याची आपल्याकडे दृष्टी हवी.
         – प्रा. नारायण गिरप. (८१४९८१७०४९)

Leave a Reply