हवामान बदलाचे दाहक वास्तव आणि आपली जबाबदारी

  गणेशोत्सवाच्या आनंदात आणि सणाच्या मंगल उत्साहात मग्न असलेल्या कोकणवासीयांच्या  मनावर यंदा एका वेगळ्याच आणि गंभीर भीतीचे सावट पसरले आहे. एरवी इथला भाग आणि पावसाचे नाते अतिशय  जिव्हाळ्याचे राहिले आहे. पावसाचा सडा पडला की डोंगर हिरवेगार होतात, ओढे-नाले खळाळतात, नद्या दुथडी भरून वाहतात आणि विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावते. पावसाचे आगमन म्हणजे केवळ ऋतू बदलण्याची खूण नसते, तर तो इथल्या शेतीपासून दैनंदिन जीवनापर्यंतच्या सर्व प्रक्रियेला सुरळीत ठेवणारा जीवनदायी स्त्रोत असतो. मात्र, बदलत्या जागतिक हवामानामुळे आणि निसर्गाच्या चक्रातील अनपेक्षित बदलांमुळे या शाश्वत चक्राला सुरुंग लागला आहे. यंदाचा लांबलेला  मान्सून आणि अधूनमधून घेतलेली विश्रांती आणि त्यानंतर झालेले अवकाळी व लहरी वितरण याने कोकणातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य माणसाच्या मनात भविष्याविषयी एक अनामिक धडकी भरवली आहे. यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जाणवलेली पावसाची मोठी तूट ही केवळ आकडेवारीचा विषय नाही; तिचा थेट संबंध आपल्या जमिनीतील ओलावा, विहिरींची पाणी पातळी, तलावांमधील साठा आणि आगामी काळातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेशी आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबल्याने आणि नंतर त्याचे प्रमाण व वितरण अनिश्चित झाल्याने निसर्गाचे संपूर्ण गणित कोलमडले आहे. पूर्वी कोकणात पावसाची चिंता नव्हती; पाऊस कधी पडेल, किती पडेल याविषयी कोणालाही साशंकता वाटत नव्हती. पण आज आभाळातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन कसे करायचे आणि उपलब्ध पाण्याचा वापर किती काटकसरीने करायचा, हा प्रश्न अत्यंत गंभीर बनून आपल्या समोर उभा ठाकला आहे.
​​           कोकणातील कृषी संस्कृतीचा कणा असलेल्या आंबा आणि काजू बागायतीवर या लहरी हवामानाचा सर्वात मोठा आघात झाला आहे. कोकणातील हापूस आंबा आणि काजू हे येथील शेकडो कुटुंबांच्या आर्थिक जीवनाचा मुख्य आधार आहेत. परंतु,  हवामानातील तीव्र बदलांमुळे मोहोर येण्याचा काळ, फळधारणा आणि पिकांची वाढ यांचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे. पावसाचा अनपेक्षित लहरीपणा, हवेतील आर्द्रतेतील कमालीचे फेरबदल आणि अवकाळी पाऊस किंवा उष्णतेच्या लाटा यामुळे बागांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कधी अतिवृष्टीमुळे फूलगळ होते, तर कधी ऐन फळधारणेच्या वेळी पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे फळांची वाढ खुंटते. यामुळे  कष्टकरी बागायतदारांच्या हाती येणारे उत्पादन घटले असून, आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केवळ फळबागाच नव्हे, तर येथील पारंपरिक भातशेती आणि इतर पिकेही संकटात सापडली आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे पेरणीच्या वेळा चुकत आहेत आणि रोपांच्या वाढीच्या टप्प्यावर पाणी कमी पडल्याने पिके करपून जात आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी आज हतबल झाला आहे.
​      पावसाची अनिश्चितता आणि हवामानाचे बदल ही केवळ तात्पुरती अडचण नसून ती भविष्यातील भीषण जलसंकटाची नांदी आहे.  आज जर आपण पाण्याचा थेंबन् थेंब वाचवला नाही, तर येणारी पिढी आपल्याला  कधीही क्षमा करणार नाही.” हवामानावरील या दुष्परिणामांचे मूळ केवळ पावसाच्या खंडात नाही, तर जागतिक तापमानवाढ, ‘एल निनोचा’ प्रभाव आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात होणाऱ्या आमूलाग्र बदलांमध्ये दडलेले आहे.
कोकणातील वातावरणात झालेला हा बदल आता केवळ ऋतूंपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो मानवी आरोग्यावरही परिणाम करू लागला आहे. सप्टेंबर महिन्यातील असह्य उन्हाचा तडाखा, हवेतील प्रचंड उष्मा आणि घाम फोडणारे वातावरण यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सवात बाप्पाच्या आरतीत बाहेर पाऊस आणि मंद गारवा असावा, अशी अपेक्षा असते. परंतु, यंदा आरती करताना घामाच्या धारा वाहत आहेत.
समुद्राच्या पातळीतील वाढ आणि ‘एल निनो’च्या प्रभावामुळे समुद्रातील मत्स्यव्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे. अनधिकृत आणि विनाशकारी एलईडी मासेमारीमुळे समुद्रातील जलचर संपत्ती धोक्यात आली आहे. हवामानातील या टोकाच्या बदलांमुळे वादळे, चक्रीवादळांची वारंवारता आणि अतिवृष्टीचे प्रकार वाढले आहेत, ज्याचा थेट फटका किनारपट्टीवरील मच्छिमारांना व गावकऱ्यांना बसत आहे.
​    या गंभीर संकटातून मार्ग काढायचा असेल, तर आता केवळ आकाशाकडे डोळे लावून बसून चालणार नाही. पावसाची वाट पाहण्यापेक्षा उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक  थेंबाचे संवर्धन आणि नियोजन करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. हवामान बदल तापमान वाढ या संकटावर मात करण्यासाठी
प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी आपल्या विकासाच्या व्याख्या निसर्गस्नेही आणि पर्यावरण पूरक राहतील याकडे लक्ष दिले पाहिजे. ग्रामस्थांनी देखील गावागावांत जलसुरक्षेसाठी लोकसहभागातून पावले उचलली पाहिजेत. गावपातळीवर विहिरी, तलाव, पाझर तलाव आणि जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज आहे.
पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे, उपलब्ध पाण्याचा अतिवापर टाळणे आणि पाण्याचे योग्य रेशनिंग करण्याची मानसिकता नागरिकांनी ठेवली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर, ठिबक सिंचन आणि जलसंधारणाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. कोकणातील प्रत्येक गावाने आपले स्वतंत्र पाणी नियोजन तयार केले तरच आपण आगामी काळातील दुष्काळ आणि भीषण जलसंकटापासून आपल्या परिसराचे रक्षण करू शकू. बाप्पाच्या आगमनाने जशी घराघरांमध्ये आनंदाची रोषणाई होते, तसेच प्रत्येक गावात जलसंवर्धनाची ज्योत पेटवण्याची  हीच  योग्य वेळ आहे.

Leave a Reply