मिलिंद देसाई…समाजभान असलेला लोकसेवक…भावपूर्ण आदरांजली!

मिलिंदला अनंताच्या प्रवासाला जाऊन बारा  दिवस होऊन गेलेत. त्याचं असं लवकर निघून जाणं, मनाने स्विकारलंच नाही. कसं स्वीकारू? जवळपास ४०-४२ वर्षांची मैत्री…तो रत्नागिरीत आयटीआयला शिकण्यासाठी संघाच्या आदर्श वसतिगृहात रहायला आलेला. तिथे माझे बाबाच वसतिगृहाची व्यवस्था पहायचे. आम्ही तिथेच संघ कार्यालयाच्या आवारातच रहात होतो.तिथे मिलिंद प्रथम भेटला. त्यावेळच्या आठवणी तशा अंधुकशाच आहेत, पण मग ८८-८९ साली आम्ही कुडाळला घरी रहायला आलो नि “सदिच्छा न्यूज एजन्सी”त मिलिंद पुन्हा भेटला. त्याचेच ते दुकान…पेपर स्टाॅल, कोल्ड्रिंक्स, दूध विक्री असा व्यवसाय तो तिथे करायचा. पण खऱ्या अर्थाने ते संघ परिवाराचे, साऱ्याच परिवारातील संस्थांचे “संपर्क कार्यालय” होते नि सगळ्यांचाच खऱ्या अर्थाने “कुडाळचा पालक” मिलिंदच होता.
पहाटे ४-४:३० वाजताच तो पेपर वितरणासाठी दुकानात यायचा नि रात्री ८ वाजेपर्यंत
त्याच्याकडे संघ स्वयंसेवक,परिवारातील कार्यकर्ते, प्रचारक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि मदतीच्या अपेक्षेने येणाऱ्या गरजूंचा वावर असायचा. या साऱ्यात मिलिंद पेपर वितरणासाठी स्वतः बाहेर
पडायचा. कुणाचे निरोप, प्रचारकांची भोजन व्यवस्था, रुग्णांसाठी रक्तदात्यांची व्यवस्था यात तो व्यस्त असायचा. दुकानात येणारा कुणीही ग्राहक, नाहीतर स्वयंसेवक, हायस्कूलचे परिचित शिक्षक, एखादा पक्षीय कार्यकर्ता यांना गल्ल्यावर बसवून तो तासभरसुद्धा कुठल्यातरी विधायक कामालाच जाऊन यायचा. असा मिलिंद अगदी गेल्या वर्षभरापूर्वीपर्यंत आम्ही पहात आलो.
      मिलिंदचा षष्ठाब्दिपूर्ती वाढदिवस आम्ही साऱ्यांनी त्याच्या घरी जोरात साजरा केला. अनेक संस्थांचे कार्यकर्ते, संघपरिवारातील अनेकजण, काही नेतेही त्याला शुभेच्छा द्यायला आले होते. तेव्हा तो कुडाळला किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात साऱ्यांनाच एक नि:स्पृह जनसेवक, हिंदुत्ववादी कार्यकर्ता, परोपकारी समाजदूत म्हणून सुपरिचितच होता. गेल्या वर्षभरापूर्वीही तो साऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक नि हिंदुत्वाचा जागर केल्या जाणाऱ्या सर्वच कार्यक्रमात अग्रेसर असायचा.
     साठीनंतरच तो अचानक काही आजारपणामुळे कुडाळ, गोवा, पडवे इथे रुग्णालयात भरती झाला, काही महिने ॲडमीट राहून त्याचे पथ्यपाणी, नियमित दिनक्रम, विश्रांती असे रूटीन चालूं होते. त्याने दुकान चालवायला दिले नि तिथले संपर्क कार्यालय ‘अबोल’ झाले. पण मिलिंदचा चळवळ्या स्वभाव, क्रियाशील कार्यकर्त्याचा पिंड नि समाजाबरोबरचा ‘कनेक्ट’ यामुळे तो या आजारपणातही “नववर्ष स्वागत यात्रा”,”बलिदान मास” नि “पुरुषोत्तम मासातील धार्मिक अनुष्ठान” यात दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सहभागी झाला होता. आजारपणामुळे अशक्तपणा आलेला, तब्येत थोडीशी रोडावलेली! तरीही ढोलावर पडणारी थाप नि पालखी नाचवण्याची हौस त्याने सहजतेने नववर्ष स्वागत यात्रेत पूर्ण करून घेतली.
     त्यानंतर मात्र आजाराने त्याच्या उत्साहावर जरा मर्यादा आल्या. तरीही तो नियमित उपचारांसाठी स्वतः मोटारसायकल घेऊन डाॅक्टरांकडे जून महिन्यातही जात होता. मग मी एकदा ३-४ ऑगस्टला कुडाळला गेलो असताना, त्याला पडव्याला हाॅस्पिटलला ॲडमीट केल्याचे समजले नि मी व नितीन देसाई त्याला भेटायला गेलो. ४२ वर्षांच्या मैत्रीत पहिल्यांदाच मी त्याला इतका हताश, थकलेला पाहिला. मला पुण्याहून आलेला पाहून, त्याच्या डोळ्यात अश्रूं तरळले नि हातात हात घेऊन तो हळूवार आवाजात बोलला,”अवि,आयुष्यातील सगळी मजा आता संपली रे! आता परत भेट होईल कां माहीत नाही, पण घरी लक्ष ठेव रे!”
       मी इतक्या वर्षात कायम हसतखेळत बोलणारा, मिश्किल शब्दांनी वातावरणात आनंद पेरणारा मिलिंद पाहिलेला, त्यामुळे मला गलबलून आलं, मी त्याला “अरे, सर्वजण तुझी काळजी घेताहेत, औषधोपचार नि पथ्यपाणी नीट चालू आहे. तू अनेकांच्या मदतीसाठी धावलास, त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत तुझ्या! तू बरा होऊनच परतशील नि नेहमीसारखेच आपण कुडाळातल्या कार्यक्रमात एकत्र असू. तू काळजी नको करू रे!” असं म्हणत तिथून लगेच बाहेर पडलो.त्यानंतर तो घरी परतला.दोनदा खुशालीसाठी फोनही झाला होता.
    …नि यावेळी दिवाळीसाठी कुडाळला जातानाच कुणीतरी मिलिंद पडव्याला पुन्हा ॲडमीट आहे कळवले. गेल्यावर लगेचच त्याला भेटायला जायचे ठरवलेले. तोपर्यंत त्याला गोव्यात ‘गोवा मेडिकल कॉलेज’मध्ये ॲडमीट केल्याचे समजले. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही कुटुंबीय तिथे पोचलो. दोन तास भेटायला दिले नाही, नचिकेत…मिलिंदचा मुलगा त्यामुळे थोडा अस्वस्थ झालेला, त्यातच मिलिंदची तब्येत जरा अप-डाऊन होत
होती. पण आम्ही सर्वजण त्याला भेटून, त्याच्याशी बोलूनच बाहेर पडलो. तो जेवण घेत होता, बोलत व्यवस्थित होता, मात्र खूपच बारीक झाला होता, डोळ्यांवर झापड येत होती, पण सर्वांना त्याने ओळखले, बोललाही दोन शब्द! त्यामुळे यावेळीही हा “हिंदुत्वाचा बुलंद हुंकार” घरी येणार, जनसेवेसाठी पुन्हा उभा रहाणार अशी एक वेडी आशा मनात घेऊनच त्याचा निरोप घेऊन निघालो.
      जेमतेम पाच दिवस गेले नि १४ तारीखला ‘बालदिनी’ सगळ्या आबालवृद्धांचा, गरजूंचा आधारवड, आमचा साऱ्यांच्याच प्रेरणास्रोत मिलिंद सायंकाळी अनंताच्या प्रवासाला, कधीही परत न भेटण्यासाठी निघून गेला. ती बातमी कानांवर पडल्या क्षणापासून मन अस्वस्थ झालं.
त्याच्याबरोबरच्या मैत्रीच्या, कौटुंबिक स्नेहबंधाच्या अनेक आठवणी मनांत दिवसरात्र घोंगावतच राहिल्या.
       गेल्या २८ ऑक्टोबरपासून अभाविप पूर्व कार्यकर्ता संजय जोशी, ब्राह्मण मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते पु.वा.हर्डीकरकाका नि १४ नोव्हेंबरला निष्ठावान स्वयंसेवक, जनसेवक नि खूप जवळचा, मोठ्या भावासारखाच असलेला मिलिंद देसाई या तिघांचेही जाणे हे जिव्हारी लागणारेच आहे.
       मिलिंद,अरे इतक्या लवकर एक्झिट कशी काय घेतलीस रे? तू कुडाळच्या साऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मुकुटमणी होतास रे! अनेक उपक्रम अजून करायचे बाकी होते रे! तू कुडाळला पहिल्यांदा ढोलताशे आणलेस नि पंचक्रोशीतील अनेक तरुणांना पारंगत केलेस, अजून अशी अनेक मंडळे तुझ्या मार्गदर्शनाखाली पारंगत व्हायची वाट पहातच राहिली ना रे! तू जातपात,धर्म,पक्षीय भेदाभेद न करता रात्री-अपरात्री हाकेला धावलास! रुग्ण कुठल्या गावचा, किती वयाचा, कोणत्या जातीधर्माचा हे न विचारताच त्यांना रक्तदाता मिळवून देण्यासाठी स्वतःचा वेळ, गाडी, पैसा याचा कधीच विचार केला नाहीस! आता हे सारं इतक्या निरपेक्षपणे, धावून जाऊन कोण करणार रे?
तू अगदीच अकल्पितपणे आमची साथ सोडलीस मित्रा! तुझ्याबरोबरच्या रामजन्मभूमी आंदोलन, यात्रा यांमधील आठवणी, निवडणुकीतील प्रचार, संघ उत्सव यातील धावपळ नि त्यावेळची मजा,
ब्राह्मण मंडळ, अभाविप, परिवारातील संस्था यांच्या कार्यक्रमातील तुझी बहुमोल साथ, कौटुंबिक जीवनातील सुख-दुःखाच्या वेळचा तुझा सहभाग हे सारं आता “आठवणींच्या कप्प्यात” शोधत बसायचं का रे? तू एक-दीड वर्षानेच मोठा तर होतास, हे जायचं वय होतं कां रे मित्रा? पण मग मागे ठेवून, तुझं संस्कारक्षम असलेलं कुटुंब, आप्तेष्ट, आमच्यासारखे असंख्य मित्र नि तुझ्या सेवाभावी वृत्तीने संतुष्ट झालेले अनेकजण यांना तू ‘पोरकंच’ केलंस ना रे! तुझ्या आठवणींचा दरवळ, तुझ्या विनोदी किस्स्यांचा झरा सतत मनात वाहतच राहील, पण तुझा हसरा, मिश्किल चेहरा आता कुडाळच्या भेटीत नाहीच भेटणार रे!
       मिलिंदच्या असंख्य आठवणींचा ‘कॅलिडोस्कोप’ जीवनात रंगीत चित्रे उमटविणारा होता. त्याचा मुलांच्या बारशाच्या समारंभातला सहभाग असो वा एखाद्याच्या निर्वाणाच्या अंतिम यात्रेतला सहभाग असो, तो निरपेक्ष मदतीचा हात देणाराच असायचा. तिथे आपल्या हजरजबाबी, उत्स्फूर्त नि मिश्किल स्वभावाने तो वातावरण हलकंफुलकं करायचा. त्याने आपल्या दुकानाच्या गल्ल्याला कधीच कुलूप लावले नाही. त्याने व्यवसायाच्या खुर्चीवर बसवलेल्या प्रत्येकावर नितांत विश्वास ठेवला. अनेकांना मदत करताना कुठलाच स्वार्थ, अपेक्षा मनात ठेवला नाही. कुठल्याही पदाची, मानसन्मानाची अभिलाषा त्याच्या मनाला कधीच शिवली नाही. मात्र असं असूनही शहरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील नव्हे तर राज्यस्तरीय नि केंद्रीयस्तरीय कार्यकर्ते, प्रचारक, नेते मिलिंदच्या दुकानाला पाय लावल्याशिवाय पुढे गेले नाहीत.
        आज मिलिंदच्या आत्म्याला सद्गती लाभेल, त्याला मोक्ष मिळेल यात कुणालाच संदेह नसेल, कारण त्याने कधीच कसलीच अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवली नाही. जे केलं, जसं केलं ते स्वतःच्या कष्टांनी, स्वबळावर नि अविरत मेहनतीने त्याने मिळवलं. आत्ता कुठे तर समाधानी, निवांत, भरभरून जगण्याचे क्षण त्याला खऱ्या अर्थाने लाभले होते नि एका अल्पशा आजाराने त्याला स्वर्गलोकीचे निमंत्रण आले, हे मनाला न पटणारे, नियतीवर नाराज व्हावे असेच आहे.
         मिलिंद खऱ्या अर्थाने जगन्मित्र होता, जनसेवक होता, गरजूंचा हात होता, हिंदुत्वाचा आवाज होता. परोपकाराचा झरा होता. किती आठवणी आहेत त्याच्या सहवासातल्या! विनोदी किस्से अगदी स्मशानभूमीतलेही असंख्य आठवताहेत. त्याच्याशी बोलतांना एकदा “स्मशानभूमीतले मिलिंदचे किस्से” असं पुस्तक छापूंया रे!” म्हटल्याचं आठवतंय. त्याच्या दुकानाला भेटी दिलेल्या अनेकांच्या आठवणी शब्दबद्ध करूया आपण, असंही त्याला बोललो होतो.
        आज या अनेकांना दंतकथा वाटतील पण…
आमदार असतांना आप्पासाहेब गोगटे,  अशोकराव मोडक यांना आपल्या दुकानाच्या गल्ल्यावर बसवून त्यांच्या व्यवस्थेसाठी, नाहीतर संघ परिवाराच्या कामासाठी सहज अर्धा-पाऊण तास मिलिंद बाहेर गेलेला आम्ही अनेक मित्रांनी पाहिला. इतका आपलंसं करणारा मित्र असा आठवणींचा ‘कोलाज’ मागे ठेवून जातो हे दुःख अपरिमित आहे. राष्ट्रकार्यातील एक समिधा दहा दिवसांपूर्वी आपली आहुती “राष्ट्राय स्वाहा” म्हणत देऊन गेली.
       मिलिंदच्या जाण्याने मी आतून हललो आहे.माझं वैयक्तिक न भरून येणारं नुकसान झालं आहे.कधीही हक्काने, आपुलकीने येणारा त्याचा फोन आता कायमचा ‘म्यूट’ झाला आहे. माझ्या गार्गी-निहारप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांच्या मुलांची मस्करी करणारा, त्यांचे भरभरून कौतुक करणारा ‘मिलिंदकाका’ आता ‘सदिच्छा’ द्यायला कधीच “सदिच्छा न्यूज एजन्सी”च्या पायऱ्यांवर दिसणार नाही. नववर्ष स्वागत यात्रेत पूर्वी कुडाळ शहरात हातगाडी घेऊन धर्मपताका वाटणारा मिलिंद आता भेटणार नाही. शिस्तबद्ध संचलन, स्वागतयात्रा, मिरवणुका यात मिलिंदच्या घोषणा, नाहीतर वाजणारी शिट्टी आता कधीच ऐकून येणार नाही. दु:खद आठवणीत एकच वेडे समाधान त्याची दोन मिनिटे भेट होऊन दोन शब्द बोलण्याचे नि त्याच्या अंतिम यात्रेत त्याला निरोप द्यायला तिथे होतो हेच!
       मिलिंदसारखे सेवाभावी हात हरपणं हे एक पर्व संपल्यासारखेच आहे. त्याच्या स्मृतींचा जागर कायम तेवत ठेवण्यासाठी, त्याचे निरपेक्ष कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे नि त्याची आठवण जागृत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
  -अविनाश मणेरीकर, कात्रज-पुणे.
                         मोबा. – ९४२२३७९८७८.

Leave a Reply