राजकीय हिजाब उतरवा..!

हिजाबचा मुद्दा सध्या देशभर चर्चेचा ठरला आहे. यासंदर्भात कोकणचे वेगळेपण प्रकर्षाने लक्षात येते. कारण कोकणात यापूर्वी कधी धार्मिक आयडेंटिटी (ओळख) दाखविण्याची किंवा निर्माण करण्याची चढाओढ वा परिस्थिती दिसून येत नाही. मात्र, गेल्या काही वर्षात ही धार्मिक ओळख प्रस्थापित करण्याच्या रस्सीखेचात कोकण प्रदेश देखील ओढला जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

     वास्तविक कोकणात धार्मिक आणि जातीय सलोखा पिढ्यानपिढ्या राहिला आहे. परस्पर अवलंबित्व काही धार्मिक प्रथा-परंपरा आणि उत्सवांमुळे सुद्धा विविध समाजाचे परस्परांशी नाते जोडले जाते. यामुळे कोकणात विविध समाजामध्ये असलेले धार्मिक सौहार्द कायम राहिले आहे. कोकणातील मुस्लिम स्त्रियांच्या बाबतीतही यापूर्वी अन्य कोकणी महिला- पुरुषांप्रमाणेच त्यांचेही प्रादेशिकतेला सुसंगत पेहराव असे. नंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार सर्वच समाजात वाढत गेला तरी अलिकडे काही प्रमाणात कोकणात धार्मिक पेहराव करण्याकडे कल वाढलेला दिसून येत असल्याचे बीबीसीमराठी या वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावरील साहित्यातून दिसून येते. आपल्या आसपासही आपण या संदर्भातील झालेले बदल पाहत आहोत.

     पाच राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना प्रसार माध्यमे, सोशल मीडिया यातून हिजाबचा मुद्दा गाजू लागला. कर्नाटकातील एका शैक्षणिक संस्थेने शाळेच्या आवारात हिजाबला घातलेल्या बंदीनंतर हा मुद्दा अगदी राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखा चर्चेत आला. यातून हिजाबच्या मुद्द्यावर दोन गट आणि मतांचे ध्रुवीकरण करून चिप पॉलिटिक्स (राजकारण) करणे सहज शक्य आहे. नेमक्या याच मुद्द्यावर समाजाला गुंगवून ठेवून महागाई, बेरोजगारी, वाढत्या आत्महत्या, आरोग्याचा प्रश्न, महिलांवरील अत्याचार, शेतकरी, मजूर सर्वसामान्यांच्या प्रश्नापासून दूर नेणे आणि त्यासाठी माध्यमांचा वापर करणे हे नित्याचे व्हायला नको.

     महिलांना झाकून ठेवण्याची प्रवृत्ती बहुतांश धर्मातील समाजात कमी अधिक प्रमाणात दिसून येते. त्यासाठी एका विशिष्ट समाजाला दोष देता येत नाही. कारण, आमचा समाज धर्म कसा पुढारलेला म्हणणा-यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्यांचे नेते डॉ. गोविंद पानसरे या महाराष्ट्रातील दोन समाजसुधारकांचे भरदिवसा झालेले खून विसरून चालणार नाही. खरोखरच समाज सुधारला असता तर विचारांचा प्रतिवाद विचाराने झाला असता. मात्र, धर्माचे विवेकी चिंतन मान्य नसणा-या प्रवृत्तीने दिवसाढवळ्या केलेले हे खून कट्टर धर्मांध संघटीत समाज विघातक प्रवृत्ती कार्यरत असल्याचे द्योतक आहे. आज काही समाज सुधारलेला वाटला तरी तो उच्चशिक्षण, आर्थिक स्थिती, भौतिक सुविधा, उत्पन्नाची साधने आणि सुखसोयी या बाबतीतच सुधारलेला दिसतो. कारण अजूनही जाती-पातीत समाजातील जुनाट कर्मकांडे, प्रथा-परंपरा यापासून आपण कितपत दूर आहोत? आपल्या दैनंदिन व्यवहारात आपल्या घरापासून याचा किती खोलवर प्रभाव आहे? याचे प्रत्येकाने आत्मचिंतन केल्यावर उत्तर मिळेल. यामुळे कोणा एका समाजाला दोष देऊन चालणार नाही. शिवाय कोणत्याही सामाजिक सुधारणा या केवळ नियम कायदे करून होत नाहीत. त्यासाठी सातत्याने जनजागृतीची, सामाजिक बदलांची प्रक्रिया सामाजिक कार्यकर्ते, शासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून राबवावी लागते. त्यानंतर समाजातील मानसिकता घडवून ते बदल स्वीकारले जातात. जसे हागणदारी मुक्त गाव योजना ही केवळ नियम करून झाली नाही.त्यासाठी शासन प्रशासनाने समाजप्रबोधनाची व्यापक मोहीम राबवली.

        आता प्रश्न उरतो धार्मिक आयडेंटिटी (ओळख) दाखविण्याचा. कोकणात तरी यापूर्वी अशी स्पेशल धार्मिक आयडेंटिटी दाखविण्याची चढाओढ नव्हती. आजही धार्मिक, सामाजिक कटुता नाही. मात्र धार्मिक ओळख दाखविण्याचा प्रकार अलिकडच्या काळात सुरू होऊ लागला आहे. त्यामागची कारणे राजकीय असली तरी त्याचा परिणाम तळागाळापर्यंत दिसून येत आहे. वास्तविक कोणत्याही समाजासमोर जगण्याचे एवढे प्रश्न पडले असताना केवळ धार्मिकतेतच गुरफटवून ठेवून लोकांना गुंगवून टाकणे हाच मार्ग राजकीय व्यवस्थेला लोकांच्या प्रश्नावरील अपयश लपवून ठेवण्यासाठी सोयीस्कर वाटू लागला आहे. त्यामुळे कुठेतरी असुरक्षिततेच्या भावनेतून धार्मिक ओळख तीव्रतेने प्रस्थापित करत राहणे सर्वसामान्यांच्या हिताचे नाही. जेव्हा सामान्य जनता याकडे डोळसपणे पाहिल तेव्हा राजकीय हिजाबउतरवला जाईल. पण तोपर्यंत संयमाने आणि सहजतेने हे प्रश्न समजून घेतले पाहिजेत.

 

Leave a Reply

Close Menu