महाराष्ट्र धर्माचं काय झालं…?

अखेर अजित पवार पुन्हा एकदा भाजपासोबत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. गेले काही दिवस या गोष्टीची चर्चा होती. अजित पवारांना पत्रकार प्रश्न विचारत होते पण ते या प्रश्नांना बगल देत होते. अजित पवारांच्या या नव्या बंडखोरीने भाजपाने व देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छ राजकारणाचा, भ्रष्टाचार विरोधाचा जो आव आणला होता तो किती बोगस, दांभिक, खोटा होता हे स्पष्ट झाले. सुमारे दहा वर्षापूर्वी अजित पवार सोलापुरच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांने केलेल्या आंदोलनावर बोलताना घसरले होते. ‘‘धरणात पाणी नाही तर मुतावं का?‘‘ असं ते म्हणाले होते. त्यावर राज्यभरात गदारोळ माजला होता. या मुद्यावरून अजित पवारांवर प्रचंड टिका झाली होती. भाजप नेत्यांनी, खासकरून देवेंद्र फडणवीस व समर्थकांनी यावर तोंडसुख घेतले होते. आज त्याच अजित पवारांना भाजपाने सत्तेत सहभागी करून घेतले आहे. धरणात पाणी नाही तर मुतावं का म्हणणारे अजित पवार पवित्र कसे झाले? यावर फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांची भूमिका काय असणार आहे ? ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवले, ज्यांच्यावर उठता-बसता टिका केली, ज्यांना तुरूंगात टाकण्याची भाषा केली ते अजित पवार आणि टीम राष्ट्रवादीला सत्तेत सोबतीला कसे घेतले ? अजित पवारांच्या ७० हजार कोटीच्या भ्रष्टाचारावर फडणवीसांनी भरपूर टिका करून गाडीभर पुरावे देण्याची भाषा केली हती. राष्ट्रवादीशी कधीच युती शक्य नाही. आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही. सत्तेशिवाय राहू, अविवाहीत राहू पण राष्ट्रवादीशी युती कदापी शक्य नाही! असं ओरडून बोलणारे देवेंद्र फडणवीस इतके अगतिक का झाले आहेत?

       ‘‘पार्ट वुईथ डिफ्रन्स‘‘ आता कुठं आहे? गेल्यावर्षी आघाडी सरकार पाडताना एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस सहका­यांसह सर्वांनीच सगळं बिल राष्ट्रवादीवर फाडलं. एकनाथ शिंदेसह सगळ्यांनी अजित पवारांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला. २७ जूनला मध्यप्रदेशात मोदींनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार व परिवार वादावर सडकून टीका केली. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी पक्ष म्हणून संबोधले. मग आठ दिवसांत असे काय घडले. त्या पक्षातले नऊ नेते सरकारमध्ये मंत्री म्हणून आले?

    प्रफुल्ल पटेल म्हणतात, पक्षाच्या ५४ पैकी ५१ आमदार गेल्या वर्षापासून म्हणत आहेत की, आपण भाजपसोबत जाऊ या, बहुसंख्य आमदारांच्या भावना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना समजल्या नाहीत का? आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार, पाहिजे तर लिहून देऊ का? असा प्रश्न अजितदादांनीच पत्रकारांना विचारला होता, मग त्यांच्या विचारात एकदम बदल व्हावा असे काय घडले?  भाजपासाठी सोशल माध्यमात, मित्रमंडळीत, पै-पाहूण्यात तावातावानं बॅटींग करणारे भक्तभाजपवाल्यांचे ऐकून काँग्रेस-राष्ट्रवादीवर पाकिस्तानी पक्ष असल्याच्या थाटात बोलणारे भक्त आता यावर काय बोलणार? सत्ता बदलानंतर भ्रष्ट म्हणून ज्यांच्यावर कारवाई करण्याचा खटाटोप केला, ज्यांना नोटीसा दिल्या, ज्यांना तुरूंगात टाकले असे चेहरे सत्तेत सोबत घेवून त्यांना मंत्रीपद देणारी भाजपा व त्यावर बोलणारे फडणवीस आता काय बोलणार?       

        ठाकरे सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या आमदारांना त्यावेळचे अर्थमंत्री अजित पवार हे विकासासाठी निधी देत नव्हते, असा आरोप करून एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केला, आता तेच अजित पवार शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये बसणार आहेत. आता शिंदे काय करणार?

      पुतण्याने काकांच्या विरोधात केलेल्या बंडानंतर शालिनीताई पाटील म्हणतात, पन्नास वर्षांपूर्वी ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना जो काही त्रास झाला असेल तो स्वतःला कसा होतो, हे शरद पवारांना अनुभवायला मिळेल.

    सोशल मिडियावर डॅमेज कंट्रोलसाठी कार्यरत असलेले लेखनिक आता सरसावले आहेत. ते म्हणताहेत, राजकारणात असे करावेच लागते.  लोकसभा २०२४ साठी मोदी आणि शहांच्या मागे आपण रहायला हवे. आत्तापर्यंत भाजपने आपल्यात सामावून घेतलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांना बदलावे किवा जुळवून घ्यावे लागले आहे. मनातून चिडलेल्या कट्टर भाजप मतदारांची समजूत घालताना अजित पवार आणि मंडळींना सोबत घेण्याचा निर्णय स्ट्रॅटेजिकली कसा योग्य आहे हे पटविण्यात आपली लेखणी ते खर्ची घालत आहे. परंतु, विशिष्ट विचारधारेवर विश्वास ठेऊन मतदान करणा-या सर्वसामान्य मतदाराची फसवणूक झाली हे मान्य करायला मात्र, कोणीच तयार नाहीत. महाराष्ट्र हे देशाच्या राजकारणाला दिशा देणारे प्रगतीशील राज्य मानले जाते. महाराष्ट्र धर्म सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने जनतेने ज्या नेत्यांवर दिली तेच जर जनतेला गृहित धरत असतील तर महाराष्ट्र धर्म राखण्याची जबाबदारी सामान्य जनतेवरच आलेली आहे.

 

Leave a Reply

Close Menu