सिधुदुर्गातील गणेशोत्सवाची अनोखी परंपरा – कोरोनातील नियोजन

             कोकणात सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे सण-उत्सवांची परंपरा, तेथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती त्याच भक्तिभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण कोकणचा प्रांत हा विविधतेने नटलेला असून त्याला समृद्ध कला, साहित्य व संस्कृतीचे अधिष्ठान लाभले आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती समजला जाणारा गणपती कोकणातील घरोघरी मूर्तींच्या स्वरुपात आणून पूजला जातो. तसेच सिधुदुर्ग जिल्ह्यात अलिकडच्या काळात काही ठिकाणी सार्वजनिक स्वरुपात गणपतीचे पूजन केले जात आहे. परंतु यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर अनोखी परंपरा लाभलेले आणि सार्वजनिक गणपतींचे स्वरुप काय असेल याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सूर्यकांत खवळे (देवगड), ओंकार तुळसुलकर (सावंतवाडी), देवा गावडे (नेरुर), अशोक पाडावे (आचरा) आणि गाडीअड्डा सार्वजनिक मंडळ, वेंगुर्ला यांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केले आहे.

२१ दिवसात ३ रुपात दिसणारा खवळेगणपती

     देवगड तालुका येथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक मूरमणेवाडा संस्थान अर्थात तारामुंबरीगावातील खवळे या कुटुंबामध्ये गेली ३२० वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे. सदर शिवकालीन गणपतीची कहाणीही तितकीच रंजक आहे. खवळेघराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारात होते. ते मालवण येथील मालडी गावी राहत होते. तेथील नारायण मंदिरात ते पूजा करीत असत. त्याच्या ताब्यात अनेक गुराब जातीची गलबते होती. ती मुंबरीच्या खाडीत नांगरलेली असत. तरणाबांड शिवतांडेलच्या लग्नाला काही वर्षे झाली तरी त्याची वंशवृद्धी होत नव्हती. अचानक एके दिवशी झोपेत त्याला मालडी (मालवण) या मूळ गावातील नारायण मंदिरातील गणेशाने दृष्टांत देऊन आपली स्थापना करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे १७०१मध्ये त्या गणपतीची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. २१ दिवसांचा त्यांनी सरदारांना शोभेल असा गणपती उत्सव केला. त्याचे फळ म्हणून त्याला पुत्ररत्न झाले. बालकाचे नाव त्याने गणपतीचा प्रसाद म्हणून गणोजीठेवले. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नातू तूळोजी आंग्रे हे विजयदुर्ग किल्याचे प्रमुख होते. गणोजी हे त्यांचे मुख्य सरदार होते. आंग्रे पेशव्यांना वरचढ वाटत होते. म्हणून त्यांनी इंग्रज लॉर्ड वॅटसनशी संगनमत करुन त्यांनी व पेशवे यांनी विजयदुर्ग किल्यावर हल्ला केला. तूळोजी आंग्रेनी पेशव्याशी तह केला. इंग्रजांशी मोठी लढाई झाली. त्यात तूळोजी आंग्रे यांचा पराभव झाला. गणोजी खवळेंना इंग्रजांनी अटक केली. त्यांना खारेपाटण येथील इंग्रज कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यांची १२ वर्षानी सुटका झाली. नंतर त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी तारामुंबरीत येथे खवळे यांच्या शेतात आहे. तेथे दर सोमवारी दिवा व अगरबत्ती लावली जाते. आज त्यांची ९वी, १०वी व ११वी पिढी तितक्याच आनंदाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात .

      हा गणपती खवळे कुटुंबातील व्यक्तीच बनवतात. सध्या ते काम भाऊ खवळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू चंद्रकांत व सूर्यकांत हे कोणताही साचा न वापरता बनवतात. सुमारे दीड टन माती भटवाडी या गावातील शेतजमिनीतून आणली जाते. नारळी पौर्णिमेला मूर्ती घडवण्यास प्रारंभ होतो. मूर्ती बैठी व पावणे सहा फूट उंचीची असते. दरवर्षी एकच आकार, तेच रुप व रंग आणि उंची असते. गणेश चतुर्थीला गणपतीबाप्पाच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून फक्त डोळे रंगवले जातात. त्याच स्वरुपात त्याची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा होते. तर दुस-या दिवशी उंदीर पूजेला लावतात. त्यावेळी नैवेद्य म्हणून खीर दाखवल्यावर ती शेतातही समाधीस्थळाजवळ ठेवली जाते.

      तिस-या दिवशी पुन्हा रंगकामाला सुरुवात होते. तर पाचव्या दिवशी संपूर्ण रंगकाम पूर्ण होते. संपूर्ण अंगाला लाल रंग, चंदेरी रंगाचा अंगरखा, पितांबर, सोनेरी मुकुट, त्यावर पाच फण्यांचा नाग, मागे गोल कागदी पंखा व हातावर शेला अशी विलोभनीय मूर्ती साकारली जाते. नंतर सातव्या, अकराव्या, पंधराव्या, सतराव्या व एकविसाव्या दिवसांपर्यंत सतत रंगकाम सुरुच असते. विसर्जनाच्या दिवशी दुपारी पिवळे ठिफ दिले जातात. त्यामुळे मूर्तीचा चेहरा काहीसा उग्र रूप धारण केल्याप्रमाणे दिसतो. अशाप्रकारे २१ दिवसांत तीन रुपे साकारणारा असा तो एकमेव गणपती असावा. पहिले पाच दिवस दोन वेळा व नंतर दिवसातून तीन वेळा आरती केली जाते. दररोज रात्री भजनाचा कार्यक्रम होतो. पाचव्या दिवसापासून रोज तिन्ही सांजेला गणपतीची दृष्ट काढली जाते! हे एक विशेषच म्हणावे लागेल.

      त्या उत्सवाची लिम्का बुकमध्ये चार वर्षांपूर्वीच नोंद झाली असून गिनीज बुकमध्ये नोंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या गणपतीची महती सांगणारा विघ्नहर्ता महागणपतीहा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कोकणातील देवस्थाना वर बनविलेला हा पहिलाच सिनेमा आहे.

      विसर्जनाच्या आदल्या दिवशीची रात्र लळीत अर्थात जागर म्हणून साजरी केली जाते. त्यावेळी संध्याकाळी खवळे घराण्यातील पूर्वजांच्या (गणोजी खवळे यांचे ४ पूत्र ) पगड्यांची विधिवत पूजा केली जाते. त्यास जैनपूजाम्हणतात. त्यावेळी विशिष्ट आरती म्हणत, भजन, नृत्ये, नाट्यछटा व फुगड्यांचा कार्यक्रम सादर केला जातो. मध्यरात्री तमाशाचे आयोजन केले जाते. त्यात पुरुषाला साडी नेसवतात व पाचवतात. पहाटे अंगात वारी (अवसर) येतात तेव्हा नवस फेडणे व नवे नवस बोलले जातात, पुरुषांच्या फुगड्यांचा कार्यक्रम होऊन महागणपतीची आरती करुन दृष्ट काढली जाते. २१ दिवसात ३ रुपात दिसणारा जगातील एकमेव गणपती आहे.

      विसर्जनाच्या दिवशी सकाळी खवळे कुटुंबीयांच्या पूर्वजनांना (११ पिढीतील) पिंडदानकेले जाते. गणेशोत्सवात पिंडदान होणारा हा जगातील एकमेव गणपती आहे. यावेळी भाविकांना दुपारी महाप्रसाद दिला जातो. गणपतीचे विसर्जन २१ व्या दिवशी होते. विसर्जन सोहळाही भव्यदिव्य स्वरूपात असतो. गणपतीची मूर्ती गाडीवर रथात बसवली जाते. ढोल, ताशे, लेझीम या वाद्यांसह भगवे झेंडे, तलवारी नाचवत, फटाक्यांच्या आतषबाजीत मोरया मोरयाचा गजर करत, गुलाल रंगाची उधळण करत गणेशमूर्ती समुद्रकाठी विसर्जन करण्यासाठी आणतात. तेथे दांडपट्टा, बनाटी, तलवार व लाठी असे शिवकालीन मर्दानी प्रकार खेळले जातात. विसर्जन सोहळ्यासाठी हजारो भाविक बहुसंख्येने उपस्थित असतात. पुरुष मंडळी फेर धरून नाचू लागली, की निरोपाची वेळ येते. पाण्यात प्रथम उंदीरमामाला नेण्यात येते. नंतर सागाची फळी पाटाखाली घालून महागणपती खांद्यावरून पाण्यात नेऊन विधिवत विसर्जन केले जाते.

     गणेशोत्सवाला येणा-या भाविकांचे आदरातिथ्य करण्यात खवळे बंधू कमालीचे व्यस्त असतात. परंतु कोरोना सावटामुळे शासनाच्या नियमांचा आदर करीत उत्सवाचे नियोजन केले आहे. याबरोबरीनेच यावर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून देवगड एसटी स्टॅण्डमधील कंडक्टर, रिक्षाचालक, पोलिस यांना फेड शिल्ड दिले जाणार आहे. तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन केले आहे.   

                                      – सूर्यकांत खवळे. कार्यवाह, खवळे महागणपती ट्रस्ट

————————————————————————————————————————————————————————

४२ ऐवजी २१ दिवसांचा गणेशोत्सवश्रीदेव रामेश्वर संस्थान आचरा

       इनामदार श्रीदेव रामेश्वराच्या कृपाशिर्वादाने मालवण तालुक्यातील आचरा गावाचे नाव अगदी सर्वदूर पसरलेले आहे. शाही थाटात संपन्न होणा-या रामनवमीसह देवस्थानच्या अनेक उत्सवांनी आपले वेगळेपण जपले आहे. या इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानतर्फे ४२ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सावही अगदी थाटामाटात साजरा केला जातो. या प्रथेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी काही बदल केले आहेत.

      ४२ दिवसांपर्यंत विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणारा गणेशोत्सव यंदा २१ दिवस साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सवासाठीची गणेश मूर्ती मनोहर मेस्त्री यांनी साकारली आहे. ११ दिवसानंतर शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींना अधिन राहून मोजक्या माणसांच्या उपस्थितीत स्थानिक भजन मंडळांची भजने, आरत्या श्रींसमोर सादर करण्यात येणार आहे. विविध स्वरुपांचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आलेले आहेत. या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याची मिरवणूकही शाही थाटात निघते. पिरावाडी येथील समुद्रकिनारी या गणपतीला भावपूर्ण निरोप दिला जातो. यावर्षी सदरची विसर्जन मिरवूणकही रद्द करण्यात आली असून शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी आचरा-पारवाडी येथे मोजक्याच मानकरी व देवसेवकांच्या उपस्थितीत या २१ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती इनामदार श्रीदेव रामेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव समिती प्रमुख अशोक पाडावे आणि संस्थानचे अध्यक्ष मिलिद प्रभूमिराशी यांनी दिली आहे.

————————————————————————————————————————————————————————

५२ चुलींवरील नैवेद्य दाखविला जाणारा नेरुर येथील गावडे कुटुंबांचा गणपती

         गावडे कुटुंबिय यांचं मुळ गाव हे माड्याचीवाडी. खरं तर माड्याचीवाडी हा नेरुर गावाचाच एक भाग. पण पुढे माड्याचीवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आली आणि माड्याचीवाडी हा वेगळा गाव म्हणून कागदोपत्री नोंद झाली.

      एकत्रित ५२ कुटुंबांचा गणपती अशी या गावडे कुटुंबियांच्या गणेशोत्सवाची ख्याती आहे. अनेक लोकांचा हे वाचल्यावर असा समज होतो की, ५२ कुटुंबांचा गणपती म्हणजे वेगवेगळी ५२ कुटुंब एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात की काय? पण तसा त्याचा अर्थ नसून मुळ एका गावडे कुटुंबाचा वंशवेल विस्तार वाढत जाऊन त्याची ५२ कुटुंबे बनली. पण या कुटुंबांनी जरी आपल्या सोयीसाठी वेगवेगळी घरे बांधून राहीले तरी आपला गणेशोत्सव मात्र एकत्र ठेवला. कुणीही वेगळा गणपती पूजला नाही.

          ही ५२ कुटुंब अत्यंत जुन्या काळात नद झालेली आहेत. त्यावर शेकडो वर्ष निघून गेली. कित्येक पिढ्या होऊन गेल्या. आज प्रत्यक्षात या अधिकृत ५२ कुटुंबांच्या संख्येत जवळपास दहापट वाढ होऊन ती कुटुंबे पाचशे ते साडेपाचशे कुटुंबे एवढी झाली आहेत. नेरुर गावामधील वाघचौडी नावाची पूर्ण एक वाडी या गावडे कुटुंबाची आहे. या कुटुंबातील अनेक सदस्य आपल्या कुटुंबासहीत मुंबई येथे स्थायिक झाले आहेत.

      गणेशोत्सवामध्ये गावडे कुटुंबियांचा गणपती हा प्रतिवर्षी पाच दिवस पूजला जातो. त्यात कधीही बदल होत नाही. शिवाय गणेशमुर्ती ही फेटेवाली, पगडीधारी असते. बैठ्या स्वरुपातील ही मुर्ती जवळपास पाच ते साडेपाच फुट उंचीची असते. ती त्या घरामध्येच बनवली जाते. मूर्तीकार श्री. मधुकर सडवेलकर ही मूर्ती साकारतात. नागपंचमीच्या काही दिवस आधी स्वतः प्रत्येक गावडे कुटुंबातील सदस्य मिळून या मूर्तीसाठी लागणारी माती घेऊन येतात.

         पहिल्या दिवशी गणेश पूजन व पाचव्या दिवशी देवीचा वंसा भरण्यासाठी जमलेल्या गावडे कुटुंबातील महिला सदस्या यांमुळे पहिल्या व पाचव्या दिवशी गावडे कुटुंबातील सर्व सदस्य जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी इथे दाखल होत आपली सेवा करतात. मधल्या काळात महापूजा, होम, भजने इ. कार्यक्रम आयोजित केले जातात. ५२ कुटुंबांच्या ५२ चूली या घरामध्ये आहेत व त्यावर शिजवलेला नैवेद्य श्रीगणेशाच्या चरणी अर्पण केला जातो.

        प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य म्हटला तरी ५०० ते ५३० पुरुष व तेवढ्याच महिला सदस्या अशी हजार-बाराशे लोकांची गर्दी यानिमित्ताने सहज जमा होऊ शकते. शिवाय ५ दिवसांमध्ये दर्शनासाठी येणा-यांची संख्या लक्षात घेता हा आकडा ३ ते साडेतीन हजारांच्या बाहेर जातो. कोरोनाचे संकट लक्षात घेता गावडे कुटुंबियांनी हा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व कमीत कमी सदस्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या गावडे कुटुंबाने स्वतःच स्वतःवर काही निर्बंध घालून घेतले आहे. यावर्षी प्रतिष्ठापना, पूजन व विसर्जन एवढ्याच बाबी मुख्यत्वे असणार आहेत. त्यासाठी जबाबदारी देखील वाटून देण्यात आली आहे. पाचव्या दिवशी देखील सर्व महिला सदस्यांनी देवीचा वंसा न भरता केवळ त्या त्या कुटुंबातील प्रमुख ज्येष्ठ महिला हा वंसा भरण्याचा कार्यक्रम पार पाडणार आहेत. स्वच्छ हातपाय धूवूनच घरात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सॅनिटायझर मशिनही बसविली जाणार आहे.

      मुंबईस्थित या कुटुंबातील सदस्यांनी सामाजिक भान राखत मुंबईमध्ये राहून इथली गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी आपले योगदान देण्याचे ठरविले आहे. गावडे कुटुंबातील चाकरमान्यांनी दाखवलेल्या या जागरुकतेचे सर्वच स्तरावरुन विशेष कौतुक होताना दिसत आहे.    देवेंद्र भास्कर गावडे, नेरुर-वाघचौडी

————————————————————————————————————————————————————————

सामाजिक उपक्रमातून होणार गणेशोत्सव

सावंतवाडीत चितारआळीचा राजा गणेशोत्सव मंडळ, ११५ वर्षांची परंपरा असलेले सालईवाडा येथील गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी नगरपरिषद व भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळ, वैश्यवाडा हनुमान मंदिर, उभाबाजार हनुमान मंदिर, सालईवाडा हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळे, तिलारी कॉलनी गणेशोत्सव अशी विविध गणेशोत्सव मंडळे तसेच उभाबाजार येथे काही गणेशभक्त कुटुंबे घरोघरी हलते देखाव्यांसह गणेशोत्सव साजरा करतात. सावंतवाडी शहरातील गणेशोत्सवाला हलत्या देखाव्यांची परंपरा आहे. ते पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक येत असतात. यावर्षी कोविडमुळे या उत्साहाला मुरड घालत विधायक सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प मंडळांनी केला आहे. गणेशोत्सव पूर्वीच्या बैठका, त्याचे नियेजन, देखाव्याची संकल्पना, आरास, नेत्रदिपक रोषणाई याची सावंतवाडी परिसरात धूमअसते. या मंडळांचे विविध सामाजिक उपक्रमांना योगदान असतेच.  प्रशासनाने कोविडमुळे  काही नियमावली जारी केली. मात्र, त्यापूर्वीच या मंडळांनी अत्यंत जबाबदारीने समजुतदारपणाची भूमिका घेतली, हे विशेष उल्लेखनीय आहे. सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रेरणेतून १९०५ मध्ये सुरु झाल्याचा इतिहास सांगितला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ दिवसच श्री गणेशाचे पूजन होणार आहे. मात्र, हलते देखावे, महाप्रसाद याऐवजी समाजोपयोगी उपक्रम घेतले जातील अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अॅड.दीपक नेवगी यांनी दिली आहे. या मंडळाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३५ अंध कुटुंबांना शिधा वाटप केले आहे.   

      चितारआळीच्या गणेशोत्सवाला दरवर्षी किमान दहा हजार भाविक भेट देत असतात. मंडळाने यापूर्वी राज्यस्तरावर देखील उत्कृष्ट देखाव्यासाठी पारितोषिक मिळविले आहे. त्यामुळे येथील देखावे भाविकांचे आकर्षण असते. यावर्षी मंडळाने स्वतः आचारसंहिता घालून घेत कुठेही वर्गणीला न फिरता स्वेच्छेने देणा-यांचा आदर करीत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार असल्याचे मंडळाचे सचिव मंदार नार्वेकर यांनी सांगितले. या मंडळाने माऊली कर्णबधीर (कोंडूरा) मुलांच्या शाळेला विधन विहिर खोदून देत कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

                                                  – ओंकार तुळसुलकर (सावंतवाडी), ९४२३३०१७६२

————————————————————————————————————————————————————————

गाडीअड्डा येथे  ४ फुट मूर्तीचे पूजन

     मंदिर संस्कृती असलेल्या वेंगुर्ला शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचीच कमतरता होती. ती कमतरता गाडीअड्डा येथील श्री तांबळेश्वर भगवती मित्रमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करीत भरुन काढली. या मंडळाने शहरात सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. बरीच वर्षे हे दोन्ही उत्सव सर्वांच्या सहकार्याने आणि पुढाकाराने भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात. आपल्या घरातील गणपतीप्रमाणेच या गणेशोत्सवात सर्वजण हिरीरीने काम करत असतो. ११ दिवसांच्या गणेशोत्सवात ८ ते ९ फुटांच्या गणपतीचे पूजन केले जाते. या गणपतीचे विसर्जन मांडवी किनारी होते. वेंगुर्ला बाजारपेठेतून निघणारी ही विसर्जन मिरवणूक पहाण्यासाठी नागरीक रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतात. यावर्षी कोरोनामुळे या गणपतीची उंची कमी केली असून सुमारे ४ फुटांच्या मूर्तीचे पूजन केले जाणार असल्याची माहिती या गणेशोत्सव मंडळातर्फे दिली आहे.

This Post Has One Comment

  1. ।।गणपती बाप्पा मोरया।।
    खूपच चांगली आणि उपयुक्त माहिती मिळाली
    धन्यवाद

Leave a Reply

Close Menu