तब्बल १०६ तासांनी ‘आत्मक्लेश‘ आंदोलन मागे

कोरोना रुग्णांचे वाढते मृत्यूचे प्रमाण, वाढलेला पॉझिटीव्ह रेट याबाबत चिता व्यक्त करीत जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट यांच्यामार्फत २५ जूनपासून ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले होते.

         यात राजन रेडकर, सौरभ, भूषण, राजाराम चिपकर, रिमा मेस्त्री आदी सहभागी झाले होते. उपोषणाला बसलेल्यांनी अक्षरशः पावसात भिजत कुडकुडत आंदोलन केले. तर उपोषणस्थळी ना पाणी, ना वीज अशी स्थिती होती. परंतु, त्यांच्या या उपोषणाकडे मिडिया, पोलिस आणि आरोग्य यंत्रणा सोडली तर जिल्ह्यातील नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी लक्षच दिले नाही. एवढेच नव्हे तर आजूबाजूने जाणा-या नागरिकांनीही चौकशी केली नाही. मग आपण करत असलेले हे उपोषण समाजासाठी की स्वतःच्या स्वार्थासाठी अशी शंका उपोषणकर्त्यांना वाटू लागली. सुमारे ५ दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल २९ जून रोजी तब्बल १०६ तासांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घेतली. उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठीची कार्यवाही जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे सुरु असल्याचे पत्र डॉ.शाम पाटील यांनी त्यांना दिले. तातडीने शासकीय रुग्णालय उभारण्यासाठी शासनाने निधी मंजूर करावा, जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु होते.

 

 

 

Leave a Reply

Close Menu