ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांना मुंबईत सन्मानित

सामाजिक भान राखून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल तरुण भारत, संवादच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर कान्होबा सामंत यांना सारस्वत प्रकाशन संस्थेचा, मुंबईचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गोविंद मंगेश लाड स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. दि. २५ एप्रिल रोजी मुंबईत माहीम येथे आयोजित सारस्वत चैतन्य गौरव सोहळ्यात नामांकित अस्थिरोग तज्ज्ञ व शल्यविशारद, पद्मभूषण डॉ. नंदकिशोर (नंदू) लाड व जीवन विद्या मिशनचे प्रमुख प्रसाददादा पै यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    सारस्वत प्रकाशन संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कार’ सोहळ्यात दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी या गौरव सोहळ्यात तरुण भारत संवादचे संपादक शेखर सामंत यांना वरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. घन:शाम बोरकर यांना ‘सारस्वत प्रकाशन पुरस्कार’, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता रायकर यांना ‘समाजसेवक रवींद्र पाटकर स्मृती पुरस्कार’, दशावतार चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांना ‘प्रमोदिनी व डॉ. प्रभाकर रेगे स्मृती पुरस्कार’, सुप्रसिद्ध सर्जन डॉ. गिरीश लाड यांना ‘एम. एन. देसाई स्मृती पुरस्कार’ आणि जी. एस. बी. सभा माटुंगा यांना ‘व्ही. डी. पाडगावकर स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
      सामाजिक, संस्थात्मक आणि सातत्यपूर्ण कार्यातून आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे संपादक शेखर सामंत यांनी दीर्घकाळापासून समाजाभिमुख कार्य करीत अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत जीवन विद्या मिशनचे प्रमुख प्रसाददादा पै यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा गौरव सोहळा माहीम येथील श्रीपाद दत्तात्रय तेंडुलकर मंगल कार्यालय, सारस्वत भवन येथे पार पडला.
याप्रसंगी सारस्वत प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप भिसे, कार्याध्यक्ष राजेंद्र देसाई, कार्यवाह राहुल साखळकर, विश्वस्त प्रमोद तेंडुलकर, मयुरेश पाडगावकर आणि सुधाकर लोटलीकर उपस्थित होते. सामंत यांच्या या गौरवपूर्ण यशाबद्दल पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply