अॅड.संग्राम देसाई सलग दुसऱ्यांदा विजयी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीचा अंतिम निकाल तब्बल ५७ दिवसांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर ६ जून रोजी जाहीर झाला. मुंबई उच्च न्यायालय (हायकोर्ट) परिसरात झालेल्या या मतमोजणीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड.संग्राम देसाई यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. विशेष संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेल्या भरघोस मतांच्या जोरावर त्यांनी विजयी उमेदवारांमध्ये सहावा क्रमांक पटकाविला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतून निवडून आलेले ते एकमेव उमेदवार आहेत.
मार्च महिन्यात झालेल्या या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून जवळपास दोन लाख वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण १४४ उमेदवार नशीब अजमावत होते,
त्यापैकी २३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित २ सदस्य स्वीकृत केले जाणार असून एकूण २५ सदस्यांची ही नवीन कार्यकारिणी असेल. विजयी २३ उमेदवारांमध्ये १८  पुरूष आणि ५ महिला वकिलांचा समावेश आहे.
अॅड.संग्राम देसाई यांनी गेल्या निवडणुकीत नवव्या क्रमांकाने विजय मिळविला होता. तर यंदा त्यांनी सहाव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. सिंधुदुर्गाच्या इतिहासात सलग दोनवेळा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलवर निवडून येण्याचा बहुमान मिळविणारे ते पहिलेच वकील ठरले आहेत.

Leave a Reply