महाराष्ट्र रायफल असोसिएशनतर्फे वरळी-मुंबई येथे घेण्यात आलेल्या २९ व्या कॅप्टन एस.जे.इझिकल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत वेंगुर्ला येथील गौरव दत्तप्रसाद आजगांवकर याने उज्ज्वल यश संपादन करीत दोन ब्राँझ पदकांची कमाई केली. ही स्पर्धा ४ ते ६ जून या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, धुळे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नेमबाज सहभागी झाले होते. कु. गौरव आजगांवकर याने ५० मीटर २२ पीप साईड रायफल प्रोन या प्रकारात दमदार कामगिरी करीत राज्यात तिसरी रँक प्राप्त केली. तसेच ज्युनिअर मेन व युथ मेनमध्ये ६०० पैकी ५६१ गुण मिळवित दोन ब्राँझ पदकांची कमाई केली. त्याला रत्नागिरी येथील प्रशिक्षक पुष्कराज इंगवले व राजश्री इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार विक्रम भांगले व प्रशिक्षक कांचन उपरकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शुटींग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
