सिंधुदुर्ग पर्यटनाला ‘धोरणात्मक जोड’ देण्याची वेळ!

        गेल्या काही वर्षांत कोकण, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर वेगाने पुढे आला आहे. यंदाच्या मे महिन्यात वेंगुर्ल्यासह संपूर्ण जिल्ह्यात पर्यटकांची झालेली अलोट गर्दी हेच सांगते की, इथला निसर्ग, समुद्रकिनारे आणि खाद्यसंस्कृती पर्यटकांना भुरळ पाडत आहे. स्थानिक तरुणांनी आणि मच्छिमारांनी जलसफर, कयाकिंग आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू करून पर्यटनाला व्यावसायिक रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे; मात्र वाढत्या पर्यटनाच्या प्रमाणात पायाभूत सुविधांची असणारी वानवा आता प्रकर्षाने खटकू लागली आहे.
         वेंगुर्ल्याच्या ऐतिहासिक बंदराचा परिसर असो, सागरेश्वर किनारा असो की नवाबागला जोडणारा झुलता पूल, सर्वत्र पर्यटकांची पावले पडत आहेत. परंतु, या गर्दीच्या तुलनेत प्राथमिक सुविधांचा अभाव दिसतो. समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना, विशेषतः महिलांना, स्वच्छतागृहे आणि ‘चेंजिंग रूम’साठी वणवण करावी लागते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. केवळ एक-दोन ठिकाणी लांब अंतरावर असलेल्या स्वच्छतागृहांमुळे पर्यटकांची गैरसोय तर होतेच, पण पर्यटन स्थळांच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होतो. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी पार्किंगच्या सुविधेचा अभाव या गोष्टी पर्यटन विकासात बाधा आणू शकतात. पर्यटन हंगाम संपत आला म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण दिवाळीपासून पुन्हा नवीन हंगाम सुरू होणार आहे. ही केवळ एका शहर ,तालुका अगर गावाची अडचण नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची मुख्य समस्या आहे. जर आपल्याला जागतिक दर्जाचे पर्यटन हवे असेल, तर केवळ निसर्गाचे वरदान असून चालत नाही, तिथे प्रशासकीय आणि धोरणात्मक नियोजनाची जोड देणे अनिवार्य आहे.
          सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ पारंपरिक समुद्रकिनारे दाखवून पर्यटकांना थांबवून ठेवता येणार नाही. त्यासाठी पर्यटनाला ‘धोरणात्मक जोड’ आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांची (Innovative Concepts) नितांत गरज आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ‘कासव जत्रा’ (Turtle Festival) सारखे निसर्गस्नेही उपक्रम अधिक व्यावसायिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवता येतील. ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले जेव्हा समुद्राच्या दिशेने प्रवास करतात, तो अद्भुत सोहळा  पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येऊ शकतात. सध्या शासन स्तरावर कांदळवन विभागातर्फे राबविण्यात येणारा उपक्रम महिनाभर पर्यटकांना पूर्वसूचना देऊन चांगल्या प्रकारे राबविल्या गेल्यास पर्यटनाला नवी ओळख मिळू शकते.  याच धर्तीवर सिंधुदुर्गातील समृद्ध जैवविविधतेचा वापर करून ‘फुलपाखरू महोत्सव’ किंवा पश्चिम घाटाच्या पायथ्याशी ‘जंगल ट्रेकिंग’ आणि ‘पक्षी निरीक्षण’ (Bird Watching) मोहिमा राबवता येतील. मालवणच्या स्कुबा डायव्हिंगप्रमाणेच वेंगुर्ला, देवगडच्या किनारपट्ट्यांवर सुरक्षित ‘वॉटर स्पोर्ट्स’ आणि ‘हाऊस बोट’ संस्कृती विकसित करता येऊ शकते. माझा वेंगुर्ला संस्थेतर्फे राबविण्यात येणारा पतंग महोत्सव स्थानिक स्वयंसेवी संस्था मार्फत राबविण्यात येणारे खाद्य महोत्सव यांना शासनाचे पाठबळ मिळाल्यास केवळ फिरणे नव्हे, तर पर्यटकांना ‘अनुभूती’ (Experiential Tourism) देण्यावर भर देता येईल. यामध्ये स्थानिक कृषी पर्यटनाची सांगड घालून, कोकणी मेवा कसा तयार होतो, उकड्या तांदळाची शेती किंवा आंबा-काजू प्रक्रिया उद्योग पर्यटकांना जवळून अनुभवण्याची सोय करता येईल.
हे सगळे करताना प्रत्येक पर्यटन स्थळावर उत्तम दर्जाची माहिती केंद्रे, स्वागत कमानी आणि परिसरातील इतर पर्यटन स्थळांचे नकाशे असणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुनियोजित पार्किंग व्यवस्था आणि स्थानिक प्रशासनाचा कडक अंकुश हवा. पर्यटन ही केवळ मौजमजा नसून सिंधुदुर्गाच्या अर्थकारणाचा कणा बनू शकते, याचे भान आता प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेवण्याची वेळ आली आहे. पायाभूत सुविधांची ही वानवा तातडीने दूर करून, नाविन्यपूर्ण उपक्रमांची धोरणात्मक जोड दिली, तरच आपला सिंधुदुर्ग खऱ्या अर्थाने देशातील आघाडीचे ‘आदर्श पर्यटन केंद्र’ म्हणून नावारूपास येईल; अन्यथा पर्यटकांची केवळ गर्दी होईल, समृद्धी येणार नाही.

Leave a Reply