महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, वेंगुर्ला तालुक्यातील सर्व प्रवाशांनी नवीन NCMC कार्ड घेताना निश्चित करण्यात आलेला 199 रुपये या दरानुसारच NCMC कार्डची नोंदणी करावी. अवाजवी दर देऊ नयेत, असे आवाहन रा.प.वेंगुर्ला आगाराचे आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे
यांनी केले आहे.
