वेंगुर्ला येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या ईश्वरपूर येथे आपल्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या शिवानी आनंद बांदेकर (शिवानी कृष्णा रोकडे) यांची ‘आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ (Asia Book of World Record) आणि ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड’ (World Excellence Book of Record) मध्ये नुकतीच मानाची नोंद झाली आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे ईश्वरपूरसह संपूर्ण कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.शिक्षक भरती प्रक्रियेत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या ‘स्वप्नस्फुर्ती शिक्षक भरती मार्गदर्शन केंद्र, ईश्वरपूर (सांगली)’ च्या त्या संचालिका आहेत. शिक्षक होऊ पाहणाऱ्या हजारो तरुण-तरुणींना टीईटी (TET), सीटीईटी (CTET), टॅट (TAIT) आणि सेट (SET) यांसारख्या परीक्षांसाठी त्यांनी आजवर अत्यंत कल्पकतेने आणि यशस्वीरीत्या मार्गदर्शन केले आहे. केवळ मार्गदर्शनच नाही, तर विद्यार्थी हितासाठी त्यांनी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) आणि ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) या महत्त्वपूर्ण पुस्तकांचे उत्कृष्ट लेखनही केले आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण, दिशादर्शक आणि समर्पित कार्याची जागतिक पातळीवर दखल घेऊन त्यांना हे दोन विशेष आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आले आहेत.
वेंगुर्ल्यासारख्या कोकणच्या भूमीतून येऊन ईश्वरपूरमध्ये हे विश्व उभे करताना अनेक आव्हाने आली, पण जिद्दीने काम करत राहिले. या यशात माझे पती आणि ‘स्वप्नस्फुर्ती अकॅडमी’चे संस्थापक श्री. कृष्णा रोकडे यांचे खंबीर पाठबळ तसेच माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, विद्यार्थी-मित्रांचे अफाट प्रेम अत्यंत मोलाचे ठरले,’ अशी कृतज्ञतेची भावना शिवानी बांदेकर यांनी व्यक्त केली.
सौ. शिवानी बांदेकर- रोकडे यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.
